महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:00 PM2019-08-05T23:00:04+5:302019-08-05T23:00:29+5:30
संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवून पाणी फाउंडेशनची स्थापना करण्यात आलीे. या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व कामातून पाणी अडवा पाणी जिरवा, तसेच पाणी बचतीचा संदेश प्रत्येक माणसाच्या मनात रुजावा यासाठी ही संस्था काम करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवून पाणी फाउंडेशनची स्थापना करण्यात आलीे. या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व कामातून पाणी अडवा पाणी जिरवा, तसेच पाणी बचतीचा संदेश प्रत्येक माणसाच्या मनात रुजावा यासाठी ही संस्था काम करीत आहे. या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील जवळपास साडेचार हजार गावांमध्ये जलदूतांच्या सहाय्याने या संस्थेची कार्ये केली जातात. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक माणसाने पाणी फाऊंडेशनच्या अभियानात सहभागी व्हावे, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आता एकत्रित प्रयत्न करू या, असे आवाहन सुप्रसिध्द सिनेअभिनेते आमिर खान यांनी केले.
येथील प्रियदर्शिनी सभागृहात चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूरतर्फे जलसाक्षरता अभियान, जनशक्ती आणि जनशक्ती संमेलन व संवाद कार्यक्रम सोबतच जलशक्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमांमध्ये वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूर नगरपालिकेचे अध्यक्ष हरीष शर्मा आदी उपस्थित होते. आमीर खान यांनी उपस्थितांना संबोधित करताना पाणी फाउंडेशन या संस्थेमार्फत केलेल्या कार्याचा संक्षिप्त लेखाजोखा मांडला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे या कार्यक्रमात आपली भेट जलपुरूष राजेंद्रसिंह यांच्यासोबत झाली. डॉ. राजेंद्र सिंह यांच्या प्रत्यक्ष भेटीचा आज योग जुळून आला.
चंद्रपूर येथे मी पहिल्यांदाच आलो असून आज जलशक्ती कार्यक्रमाच्या मंचावर त्यांच्या भेटीचा योग आल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जमिनीत पाण्याचे पुनर्भरण गरजेचे- राजेंद्र सिंह
महाराष्ट्र जमिनीची भूजल पातळी खालावली आहे. कारण येथे आजवर केवळ जमिनीच्या पोटातून पाणी काढण्याचे काम झाले आहे. मात्र पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत टाकण्याचे कुठलेच प्रयत्न करण्यात आले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पाणी समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवायची असेल तर बाष्पीभवन रोखून जमिनीत पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम आम्हाला करावे लागेल. हे एका व्यक्तीचे काम होत नसून यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केल्यास महाराष्ट्राच्या जलपातळीमध्ये निश्चित वाढ होईल, असा विश्वास जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.
चिमुकल्या सैनिकांनी घेतले आमिरसोबत भोजन
चंद्रपूर : दिवसभरातील व्यस्त कार्यक्रमांना हजेरी लावून सुप्रसिद्ध अभिनेता आमीर खान यांनी नव्यानेच उभी झालेल्या चंद्रपूरच्या सैनिकी शाळेला भेट दिली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके उपस्थित होते. सैनिकी शाळेमध्ये आमीर खानचे आगमन होताच शाळेचे प्राचार्य स्कॉरडन लीडर नरेश कुमार व उपप्राचार्य लेफ्टनन कॅडर अनमोल यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमीर खान यांनी सैनिकी शाळेच्या बांधकाम, प्रशासन, शैक्षणिक सुविधा सोबतच विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाºया विविध सुविधांविषयी माहितीपटाद्वारे माहिती जाणून घेतली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भारतातील २६ व्या सैनिकी शाळेच्या निर्मितीमागची भूमिका व याबाबतचा घटनाक्रम सांगितला. यानंतर आमीर खानने शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांसमवेत भोजनाचा आनंद घेतला.
जलसाक्षरतेचे काम करणाऱ्यांचा सत्कार
या कार्यक्रमामध्ये जलसाक्षरतेची उल्लेखनीय काम केलेल्या डॉक्टर सुमित पांडे, माधव कोटस्थाने, रमाकांत बापू कुलकर्णी, डॉ.श्रीनिवास वडगबाळकर, किशोर धारिया, राजेश पंडित, स्नेहल दोंदे, डॉ. काशीवार, प्रभू नुसाजी गव्हारे, माधुरी देशकर, जनबंधू, राहुल गुडगाणे यासर्व जलनायक व जल प्रेमी यांचा ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, आमदार नाना शामकुळे, बल्लारपूर नगराध्यक्ष हरिष शर्मा, मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, यासोबतच चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी तथा विभागीय जलसाक्षरता केंद्राचे संचालक अशोक खडसे, अप्पर संचालक प्रशांत खाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजय धवने यांनी केले.