करवाढीसाठी जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायतींना पत्र
By admin | Published: February 16, 2016 01:17 AM2016-02-16T01:17:05+5:302016-02-16T01:17:05+5:30
नव्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतींमार्फत वसूल केले जाणारे कर वाढविण्यात यावे, असे पत्र जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व
चंद्रपूर : नव्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतींमार्फत वसूल केले जाणारे कर वाढविण्यात यावे, असे पत्र जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना पाठविले आहे. त्यामुळे या पत्राची दखल घेत ग्रामपंचायतींनी करवाढ केल्यास ग्रामीण नागरिकांवरही आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे.
आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतींची कर वसुली ५० टक्केही झालेली नाही. कर वसुली करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वारंवार सुचना दिली जात आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून कर वसुलीसाठी ठोस पाऊले उचलली जात नसल्याने नागरिकही कराचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी अनेक ग्रामपंचायतींची करवसुली थकीत आहे. याचा परिणाम गावातील विकास कामांवर होत आहे.
जिल्हा परिषदेच्या पत्रानुसार ८ ते १० टक्के करवाढ करण्याचे म्हटले आहे. ही करवाढ लागू केल्यास ग्रामीण नागरिकांचाही आर्थिक बजेट कोलमडणार आहे. चंद्रपूर शहर मनपा प्रशासनाने कर वाढ केल्याच्या कारणावरून चंद्रपुरात नागरिकांचे आंदोलन झाले. अनेकांनी करवाढीवर आक्षेप घेत कर वाढ मागे घेण्याची विनंती केली. आता तर सर्व ग्रामपंचायतींना कर वाढ करण्याचे पत्र जिल्हा परिषदेने पाठविल्याने व ही कर वाढ लागू केल्यास नागरिकांचा असंतोष वाढण्याची शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)