दूर्बिणीद्वारे काढले श्वसननलिकेत अडकलेले पेनचे झाकण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:15 AM2017-10-08T01:15:39+5:302017-10-08T01:15:48+5:30
एका दहा वर्षीय बालकाच्या श्वसननलिकेत अडकलेले पेनचे झाकण दूर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : एका दहा वर्षीय बालकाच्या श्वसननलिकेत अडकलेले पेनचे झाकण दूर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आले. सामान्य रुग्णालय चंद्रपूर बालरोग अतिदक्षता विभागात डॉक्टरांनी ही किमया साधली.
प्रितम उद्धव चप्पलवार रा. सुकनेगाव जि. यवतमाळ असे या बालकाचे नाव आहे. अशा प्रकारची जिल्हा रुग्णालयातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे मानले जात आहे.
अभ्यास करीत असताना प्रितमने तोंडात पेन टाकली असता, झाकण तुटून त्याच्या श्वसननलिकेत अडकिले. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याची प्रकृती खालावली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बालकाचे आई-वडील भयभीत झाले. कशामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली, त्याचे कारणही त्यांना कळेना. प्रकृतीचे गांभीर्य ओळखून त्यांनी चंद्रपूरचे सामान्य रुग्णालय गाठले. त्याला बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. एम.जे. खान यांनी त्याची तपासणी करून त्याचे एक्स-रे काढले व त्यांनी बालकाच्या फुफ्फुसात काही तुकडा अडकिल्याचा संशय आला. त्यांनी बालकाचे लगेच सि.टी. स्कॅन करवून घेतले व त्यास त्याच्या फुफुसात पेनचे झाकण अडकिल्याचे निष्पन्न झाले. बालकाचे प्राण वाचविण्यासाठी इतर तज्ज्ञांची आवश्यकता असल्याने खान यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांच्याशी संपर्क केला. डॉ. मोरे यांनी तज्ज्ञ, शस्त्रक्रियागृह परिचारिका व इतर ओ.टी. कर्मचारी यांना शस्त्रक्रिया गृहात पाचारण केले. डॉ. अजय कांबळे व डॉ. मनीष मुंधडा यांनी दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याच्या श्वसननलिकेतील पेनीचे टोकर बाहेर काढले व बालकाचे प्राण वाचविले. त्यासाठी त्यांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. यु.व्ही. मुनघाटे तसेच बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. तृप्ती येरगुडे, डॉ. प्रिया बेसेकर, डॉ. किरण जानवे, परिसेविका संगिता बिमलवार व इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
सांघिक कामगिरीमुळे शस्त्रक्रिया यशस्वी
बालकाचे प्राण वाचविण्यासाठी बालरोगतज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ व शस्त्रक्रियागृह कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या सांघिक कामगिरीमुळेच आम्ही यशस्वी झालो.
- डॉ. एस.एस. मोरे, अधिष्ठाता,
शा.वै.म. चंद्रपूर
माझ्या मुलाचा पुनर्जन्मच
मुलाची प्रकृती अचानक गंभीर झालेली पाहून आम्ही भयभीत झालो व मोठ्या आशेने आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून सामान्य रुग्णालय चंद्रपूरला आलो. येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. एम.जे. खान, डॉ. मनोज भटनागर व इतर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून माझ्या मुलाचा जीव वाचवला. माझ्या मुलाचा हा पुनर्जन्मच समजतो.
- उद्धव चंपलवार, मुलाचे वडील