मित्राच्या खूनप्रकरणी जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:35 AM2017-11-08T00:35:42+5:302017-11-08T00:35:56+5:30
भद्रावती तालुक्यातील सुमठाणा चौकात १३ नोव्हेंबर २०१४ रोजी विजय इंगळे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : भद्रावती तालुक्यातील सुमठाणा चौकात १३ नोव्हेंबर २०१४ रोजी विजय इंगळे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तब्बल तीन वर्षांनंतर मंगळवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एन गौतम यांनी आरोपी मंगेश कुंभारे याला जन्मठेपेची व २ हजार रूपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली.
मृत विजय इंगळे व आरोपी मंगेश कुंभारे हे वरोरा येथील एसटी आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. मंगेश कुंभारे हा घराशेजारी राहत असल्याने दोघेही एकमेकांचे मित्र होते. मात्र मंगेशला आपल्या पत्नीसोबत मित्राचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे घटनेच्या ४ महिन्यापूर्वी त्याने स्वत:चे कुटुंब मूल तालुक्यातील चिरोली येथे हलविले होते. तरी देखील विजय हा आपल्या अनुपस्थितीत पत्नीला भेटत होता, असा आरोपीला संशय होता.
या संबंधाचा राग मनात धरून मंगेशने १३ नोव्हेंबर २०१४ रोजी दुपारी ३ वाजता भद्रावती-चंद्रपूर महामार्गावरील सुमठाना चौकात कैचीच्या पात्याने विजयला भोसकले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यानंतर आरोपी मंगेश कुंभारे याला जन्मठेप व २ हजार रूपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अॅड मिलिंद एम. देशपांडे यांनी काम पाहिले.