खाकीतील माणुसकीने दिले तरुणाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:02 AM2019-05-08T01:02:49+5:302019-05-08T01:03:22+5:30
आर्थिक विवंचनेत असलेला जिवती तालुक्यातील पिटीगुड्डा येथील संजय पवार रविवारी चंद्रपुरात नोकरी शोधण्यासाठी आला. चंद्रपुरातील अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हाने त्याला उष्माघाताचा झटका आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आर्थिक विवंचनेत असलेला जिवती तालुक्यातील पिटीगुड्डा येथील संजय पवार रविवारी चंद्रपुरात नोकरी शोधण्यासाठी आला. चंद्रपुरातील अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हाने त्याला उष्माघाताचा झटका आला. मात्र, ठाणेदार पुंजारवाड यांच्या मदतीने त्याचा जीव वाचला आणि खाकीतील माणुसकीचा पुन्हा एकदा परिचय आला.
संजय पवार दुपारच्या सुमारास चंद्रपुरात आला. काम शोधण्यासाठी वणवण भटकत असताना उन्हाच्या तडाख्याने त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्याकडे कानाडोळा केला. मात्र, पुन्हा तोच प्रकार त्यांच्यासोबत सुरु झाला.
रस्ता निर्मनुष्य असल्याने मदतीसाठी कुणीही नव्हते. त्याला पिट्टीगुड्याचे ठाणेदार पुंजरवाड काही दिवसांपूर्वीच चंद्रपुरात रुजू झाल्याची माहिती होती. तो त्यांचे घर शोधत त्यांच्याकडे पोहोचला. ते घरी नव्हते. मात्र, त्यांच्या पत्नीला संजयची प्रकृती बरी नसल्याचे लक्षात आले. त्याला घरात बोलावून निंबू सरबत दिले. दरम्यानच्या काळात पुंजरवाड यांच्याशी दूरध्वीवरुन संपर्क साधला. ते किराणा सामान आणण्याकरिता बाहेर गेले होते. याची माहिती मिळताच ते लगेच घरी परतले.
घरी आल्यानंतर त्यांनी संजयला ओळखले. त्याची विचारपूस सुरु असतानाच तो खाली कोसळला. त्यांनी संजयला उठविले आणि मोटारसायकलवर बसवून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला उष्माघाताचा झटका आल्याची माहिती दिली. त्याला त्वरित उपचारासाठी दाखल केले. कागदपत्रांची पूर्तता केली. दरम्यानच्या काळात त्यांनी पिट्टीगुडा येथे त्याच्या घरी निरोप पाठविला. मात्र, त्याची वृद्ध आईच घरी होती. पत्नी मजुरीसाठी बाहेर गेली होती, त्यामुळे तिथून कुणीच आले नाही. ते स्वत: रुग्णाजवळ दिवसभर थांबले. सायंकाळी डॉक्टरांनी त्याला सुट्टी दिली.
त्याला घरी आणण्याची तयारी केली. मात्र, संजयला आपल्या घरी परत जायचे होते. तेव्हा पाटण येथील शासकीय वाहन कामानिमित्त चंद्रपुरात आल्याची माहिती त्यांना मिळाली. डॉक्टरांनी लिहून दिलेली सर्व औषधेसुद्धा त्याला घेऊन दिली.
स्वप्न अपूर्ण
संजय आर्थिक विवंचनेत आहे. नोकरीच्या शोधात तो चंद्रपुरात आला होता. मात्र, उष्माघाताचा त्याला झटका आला आणि नोकरी शोधण्याचे स्वप्न अपूर्ण ठेवूनच आल्यापावली त्याला परत जावे लागले.