आयुष्य क्रम नाही तर उपक्रम मानून जगा

By Admin | Published: January 25, 2016 01:22 AM2016-01-25T01:22:03+5:302016-01-25T01:22:03+5:30

आव्हानं अंगावर घेणे आणि ते पेलणे, यात जे सुख असते, ते मोठे आहे. ज्यांना या सुखाची सवय लागते ते सुखाचा

Life is not a sequence, but a world of observance | आयुष्य क्रम नाही तर उपक्रम मानून जगा

आयुष्य क्रम नाही तर उपक्रम मानून जगा

googlenewsNext

चंद्रपूर : आव्हानं अंगावर घेणे आणि ते पेलणे, यात जे सुख असते, ते मोठे आहे. ज्यांना या सुखाची सवय लागते ते सुखाचा शॉर्टकट घेत नाही. आयुष्य क्रम मानून जगू नका, अनुकरण जगू नका, ते उपक्रम मानून जगा, असा सल्ला सुप्रसिध्द व्यंगचित्रकार, सिध्दहस्त लेखक मनोहर सप्रे यांनी दिला.
लोकाग्रणी अ‍ॅड. बळवंत राघव उपाख्य बाबासाहेब देशमुख स्मृती १३ वा चंद्रपूर भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आज रविवारी येथील सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, इंदुमती सप्रे व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी मनोहर सप्रे पुढे म्हणाले, समस्या नसलेले आयुष्य आपणाला कधीच आवडले नाही. समस्या हुडकून काढायच्या आणि त्या सोडवायच्या. यातील आनंद मोठा आहे. कोणताही गुरु नसताना आयुष्यभर स्वत:ला धडा शिकवित राहिलो. आर्ट आॅफ लिव्हिंगसारखा आर्ट आॅफ डार्इंगही सर्वांनी शिकावे. सरकारी नोकरी, सुखाचे आयुष्य मिळाले असतानाही आपले त्यात रमले नाही. संकटच नाही, तिथे काही करायलाही वाव नाही. त्यामुळे नोकरी सोडून स्वत:चे आयुष्य स्वत:ला पटेल, असे जगणे सुरू केले. पत्नी इंदूमती हीदेखील आपल्या पाठिशी सदैव उभी राहिल्याचे सांगत ते म्हणाले, बदकं उडत नाही, याचे मला दु:ख नाही, गरुड पंख विसरतात, याचे दु:ख आहे.
यावेळी डॉ. अभय बंग म्हणाले, अमेरिकेत बाहेरचे लोक आले आणि त्यांनी अमेरिकेला मोठे केले. तसेच मनोहर सप्रे यांनीही बाहेरुन येऊन चंद्रपूरला मोठे केले आहे. ज्या काळात नोकरी म्हणजे सर्वकाही असायचे, त्या काळात सप्रे यांनी आपल्या तत्वांसाठी नोकरी सोडली. ही सोपी गोष्ट नाही. पाठीचा कणा ताठ ठेवून जगण्यासाठी मनोहररावांनी अनेक आव्हाने लिलया पेलल्याचेही त्यांनी सांगितले. शेवटी मनोहर सप्रे यांच्या सन्मानार्थ एखादी उत्तम व्याख्यानमाला आयोजित करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे म्हणाले, मनोहर सप्रे यांचा चंद्रपुरात सन्मान व्हावा, अशी अनेकांची इच्छा होती. लोकाग्रणी बाबासाहेब देशमुख स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने हा सन्मान होत आहे, याचा आपल्याला अतिशय आनंद आहे. सप्रेंच्या काष्ठशिल्पाचे प्रदर्शन लावण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
तत्पूर्वी शांताराम पोटदुखे व डॉ. अभय बंग यांच्या हस्ते मनोहर सप्रे यांचा १३ वा चंद्रपूर भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या पत्नी इंदुमती सप्रे यांचाही साडीचोळी देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. संचालन राजा बोझावार यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Life is not a sequence, but a world of observance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.