चंद्रपूर जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या दोन अस्वलांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:55 PM2020-01-15T12:55:19+5:302020-01-15T12:55:37+5:30
चिमूर वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सावरी बिडकर येथे गावापासून १ कि मी अंतरावर शेतातील बोरीच्या झाडावर दोन अस्वल बोर खाण्यासाठी चढण्याच्या प्रयत्नात असताना तोल जाऊन झाडाला लागून असलेल्या विहीरीत पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: शेतातील झाडावर बोरं खाण्यासाठी चढलेली दोन अस्वले मंगळवारी दुपारच्या सुमारास शेतातील विहीरीत पडली. ही माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्या दोन्ही अस्वलांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबण्यात आले. त्यामध्ये वन विभागाच्या व्याघ्र सुरक्षा दल व वनअधिकाऱ्यांना यश आले आहे. या विहिरीतील दोन्ही अस्वलांना सुखरूप बाहेर काडून जीवनदान देत जंगलात सोडण्यात आले आहे.
चिमूर वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सावरी बिडकर येथे गावापासून १ कि मी अंतरावर शेतातील बोरीच्या झाडावर दोन अस्वल बोर खाण्यासाठी चढण्याच्या प्रयत्नात असताना तोल जाऊन झाडाला लागून असलेल्या विहीरीत पडली. शेतमालक राजेंद्र निकोसे विहिरीकडे जात असताना त्यांना विहिरीत काही तरी पडण्याचा आवाज आला. त्यांनी डोकावून बघितले असता दोन अस्वले पडल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ गावाकडे धाव घेऊन नागरिकांना व चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना याबाबत अवगत केले. चिमूर वनपरिक्षेत्राची चमू घटनास्थळी पोहचली. अस्वलांना बाहेर काढण्यासाठी वनअधिकारी यांनी शर्थीचे प्रयत्न केले व त्यांना बाहेर काढले. नंतर ही अस्वले जंगलात सोडून देण्यात आली.