जीवघेणी बेशिस्त
By admin | Published: January 15, 2015 10:47 PM2015-01-15T22:47:44+5:302015-01-15T22:47:44+5:30
चंद्रपूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात शेकडो नवी वाहनेही रस्त्यावर उतरत असून शहरातील वाहतूक व्यवस्था पार कोलमडली आहे. मुख्य चौकात सिग्नल आहेत,
मंगेश भांडेकर - चंद्रपूर
चंद्रपूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात शेकडो नवी वाहनेही रस्त्यावर उतरत असून शहरातील वाहतूक व्यवस्था पार कोलमडली आहे. मुख्य चौकात सिग्नल आहेत, मात्र याकडे दुर्लक्ष करुन नागरिकांकडून वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. यावर मात्र वाहतूक पोलीसही काहीच करु शकत नसल्याने बेशिस्त वाहतूक चंद्रपूरकरांसाठी जीवघेणी ठरत आहे. शहरातील अपघात व जखमींची संख्या बघता वाहतूक व्यवस्था किती बेशिस्त आहे अन् वाहनचालक किती निर्ढावले आहेत, त्याचा प्रत्यय येतो. यामुळे चंद्रपूर शहर ‘हादसों का शहर’ म्हणून ओळख मिळवते की काय, अशी भीतीदायक स्थिती स्टिंग आॅपरेशन दरम्यान दिसून आली.
शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी शहरातील १५ मुख्य चौकांमध्ये वाहतूक दिवे लावण्यात आले. मात्र ४ चौकातील वाहतूक दिवे सध्यास्थितीत बंद आहेत. तर ज्या ठिकाणी वाहतूक दिवे आहेत, त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे नागरिक सिग्नल तोडून वाहन पळवित असल्याचा प्रकार स्टिंग आॅपरेशन दरम्यान दिसून आला.
वेळ दुपारी २ वाजताची, स्थळ गिरणार चौक, वाहतूक पोलीस कार्यरत, वाहतूक दिवाही सुरु. मात्र, कार्यरत पोलीस शिपाई स्वत:चा उन्हापासून बचाव करत रस्त्याच्या कडेला उभा असताना नागरिक शिपायाच्या डोळ्यादेखत वाहन पळवित होते. काही वाहनधारक लाल दिवा लागताच थांबत होते. मात्र, दिवा बंद होण्याआधीच वाहन पळविण्यात कोणीच मागे दिसले नाही. चौक क्रॉस करताना पायी चालणाऱ्यांसाठी किती धोकादायक असते, हे येथे दिसून आले. मात्र, याचे कोणलाच सोयरसूतक नसल्याचे यावेळी दिसून आले.
वेळ दुपारी अडीच वाजताची. स्थळ गांधी चौक. चारही बाजुने वाहनांची वर्दळ. लगतच शहर पोलीस ठाणे. मात्र येथे कोणताच वाहतूक पोलीस शिपाई दिसून आला नाही. येथे गोल बाजार असल्याने मार्केटमध्ये येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे पायी चालणारे जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत असल्याचा प्रकार येथे दिसून आला.
वेळ २.४५ वाजताची, स्थळ जयंत टॉकीज चौक. येथेही वाहतूक शिपायाचा पत्ता नव्हता तर वाहतूक दिवाही बंद होता. त्यामुळे तीनही बाजुने येणारे वाहने एकमेकांत भिडून वाहतूक खोळबंत असल्याचे दिसून आले. थोड्याच अंतरावर असलेल्या छोटा बाजार चौकातही हाच प्रकार दिसून आला. येथील वाहतूक दिवा गेल्या कित्येक दिवसांपासून बंद आहे. दुपारी ३ वाजताच्या सुमारास येथेही वाहतूकीची कोंडी पाहायला मिळाली. तिनही बाजुने येणारे वाहने एकाच वेळी आल्यास येथे वाहतूक विस्कळीत होते. मात्र, वाहतूक दिवा बंद व शिपायी नसल्याने येथे वाहनधारकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे दिसून आले.
पाण्याच्या टाकीजवळ वरोरा नाका चौक, दुपारी ३.१५ वाजता. वाहतूक दिवा सुरु व वाहतूक पोलीसही कार्यरत. मात्र सिग्नल पडण्यापूर्वीच वाहनधारक वाहन हाकलत असल्याचे दिसून आले. तर अत्यंत वर्दळीचा ठिकाण असलेल्या बसस्थानक परिसरात क्षणाक्षणाला जीव गमावण्याचा धोका दिसून आला.
बसस्थानकासमोर अॅटोरिक्क्षांची गर्दी, मूल मार्गावरुन आणि उडाणपूलावरुन येणारे भरधाव वाहने त्यातच बसस्थानकावरुन सुटलेली बस वळण घेत असताना पूर्णत: वाहतूक विस्कळीत होते. बसस्थानकावर उतरलेले अनेक प्रवासी येथे रस्ता ओलांडताना जीव धोक्यात घालत असतात. काही वेळा येथे किरकोळ अपघात घडले असून हा चौक अपघातस्थळ म्हणून ओळखल्या जाते. मात्र येथे वाहतूक पोलीस दिसून आला नाही.
असाच प्रकार रामनगर चौक, वाहतूक चौकी तुकूम चौक, बंगाली कॅम्प चौक, जुना वरोरा नाका चौकातही दिसून आहे. वाहतूक पोलीस असले, नसले तरी मुजोर वाहनधारक आपल्या मर्जीने वाहन चालवित असल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशा वाहनधारकांवर कठोर कारवाईची गरज असून वाहतूक पोलिसांनाही दक्ष राहून कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे. काही ठिकाणी शिपायी कार्यरत असतात, मात्र सावलीत उभे राहून मोबाईवर बोलणे, ओळखीच्या वाहनधारकांशी चर्चा करण्यात गुंग असतात. अशा शिपायांवरही वचक असायला हवे.