कामगारांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 12:07 AM2018-11-09T00:07:50+5:302018-11-09T00:08:26+5:30
वेकोलि वणी क्षेत्रातील सुंदरनगर वसाहतील कामगारांच्या क्वार्टरच्या भिंती पडल्या आहेत. अनेकांच्या क्वार्टरच्या भिंतीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. भिंत केव्हा पडेल, याचा नेम राहिला नाही. वारंवार तक्रारी करूनही वेकोलि याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
गजानन साखरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्रातील सुंदरनगर वसाहतील कामगारांच्या क्वार्टरच्या भिंती पडल्या आहेत. अनेकांच्या क्वार्टरच्या भिंतीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. भिंत केव्हा पडेल, याचा नेम राहिला नाही. वारंवार तक्रारी करूनही वेकोलि याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे वेकोलि कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात आला आहे.
याशिवाय या वसाहतीतील नाल्यांची दुरूस्ती व साफसफाई नियमित होत नसल्याने कामगार कुटुंबीयांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. वेळोवेळी क्वार्टर व नाली दुरूस्ती आणि साफसफाई करण्याची मागणी कामगारांकडून होत असली तरी व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कामगारांकडून होत आहे.
वेकोलिच्या निलजई कोळसा खाण क्षेत्रातील सुंदरनगर कामगार वसाहत आहे. तेथील क्वार्टरच्या भिंती कोसळत आहे. अनेक क्वार्टरच्या भिंतींना ठिक ठिकाणी तडे गेलेले आहेत. क्वार्टरच्या भिंती केव्हा कोसळेल, याचा नेम नाही. दरवाजे खिडक्या तुटलेल्या आहे. अशाही अवस्थेत कामगार आपल्या कुटुंबासह याच घरात राहत आहे. दिवसा किंवा रात्री झोपताना केव्हा दुर्घटना घडेल, हे सांगता येत नाही.
याशिवाय नाल्यांची दुरूस्ती होत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे कामगारांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे.
यापूर्वी या कामगार वसाहतमधील क्वार्टरची पडझड झाली. मात्र सुदैवाने कामगार व त्याचे कुटुंबीय बचावले. क्वार्टरची दुरूस्ती व्हावी, पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची दुरूस्ती व्हावी, अशी मागणी कामगारांकडून वेळोवेळी होत आहे. या ठिकाणी कार्यरत कामगार संघटनांचे पदाधिकारीदेखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कामगाराकडून होत आहे.
स्वखर्चाने दुरुस्ती
घराच्या भिंती केव्हाही कोसळून अपघात होऊ शकतो. त्यामुळे कामगार व त्याच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार तक्रारी करूनही वेकोलि याकडे लक्ष देत नसल्याने काही कामगारांना नाईलाजाने स्वत: आपल्या खर्चाने क्वार्टर ची दुरूस्ती करावी लागत आहे. सध्या सुंदरनगर परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरू असल्याने कामगारांना कर्तव्यावर ये-जा करतानाही जीव धोक्यात घालावा लागत आहे. एकूणच आता कामगारांच्या या ज्वलंत प्रश्नाकडे वेकोलिने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.