३० वर्षानंतर प्रकाशाने उजळला झोपडपट्टी परिसर
By admin | Published: March 30, 2017 12:47 AM2017-03-30T00:47:39+5:302017-03-30T00:47:39+5:30
आदिवासी जमातीचे झोपडपट्टीधारक मागील ३० वर्षापासून अंधाराचा सामना करीत जगत होते.
गुढी पाडव्याचा मुहुर्त : आतापर्यंत अंधाराचेच होते अधिराज्य
गोंडपिपरी : आदिवासी जमातीचे झोपडपट्टीधारक मागील ३० वर्षापासून अंधाराचा सामना करीत जगत होते. ३० वर्षाच्या काळात या आदिवासींना अनेक नेते आश्वासन देवून गेलेत. मात्र या काळोख्या अंधारात जगणाऱ्या आदिवासींची परिस्थिती जैसे थेच होती. या गंभीर परिस्थितीची दखल घेत नगरपंचायतीचे उपाध्यक्ष चेतनसिंह गौर यांनी सदर मागणी विद्युत वितरण कंपनीकडे रेटून धरली. त्यामुळे गौर यांच्या सहकार्यातून प्रभाग क्र. १३ मधील आदिवासींच्या झोपेड्यांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लख्ख प्रकाश मिळाला. यामुळे झोपडपट्टीवासीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
गोंडपिपरी शहरातील प्रभाग क्र. १३ मागील ३० ते ३५ वर्षांपासून विकासाच्या दृष्टीकोनातून पिछाडीवर होता. अशातच काट्या- गोट्यांनी बरबरटलेल्या या प्रभागात आदिवासी जमातीचे, टिनटप्परचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आपल्या कुटुंबासोबत झोपडपट्या बांधून येथे राहत आहेत. या झोपड्यातून ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत मागील तीस वर्ष झोपडपट्टीवासीयांनी काढलेत. या तीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांचे मतदार यादीत नावेही आलीत व ते गोंडपिपरीचे रहिवाशीही झालेत. मात्र त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणीही पुढे येईना? निवडणूक आली तरच प्रभाग क्रमांक १३ उमेदवारांना दिसत होता. मतदान मिळविण्यासाठी अनेक उमेदवार समस्या सोडविण्याचे आश्वासन देत होते. परंतु आज ३० वर्षाच्या कार्यकाळात आश्वासनापलिकडे काहीच झाले नाही. या आदिवासी बांधवांच्या जीवन संघर्षाची माहिती नगरपंचायतीचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती चेतनसिंह गौर यांना मिळाली. त्यांनी पहिल्यांदा या प्रभागात विद्युत पुरवठा करण्याचा निश्चय केला आणि सदर समस्येच्या सोडवणुकीसाठी विद्युत वितरण कंपनीकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला. चेतनसिंह गौर यांच्या पाठपुराव्याची विद्युत वितरण कंपनीने दखल घेतली व आदिवासी सुधारणा योजने अंतर्गत अहेरी राज्य महामार्गावरुन प्राची गॅस एजन्सी समोरच्या रोडवरुन सात पोल टाकलेत आणि गुढीपाडव्याच्या शुभमूहुर्तावर येथे वास्तव्यास असलेल्या आदिवासी झोपडपट्टीवासीयांच्या झोपड्यात प्रकाश आला.
आदिवासी जमातीचे हे कुटुंब व्यावसायाने टिनटप्पर विकणारे. त्यांची विजेची समस्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. अनेकदा या त्या नेत्यांकडे जावूनही कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. मात्र त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी चेतनसिंह गौर पुढे सरसावल्याने त्यांच्या झोपड्या प्रकाशाने उजळल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)
मागील तीस वर्षापासून आम्ही दिवाबत्तीत राहत होतो. सभोवताल झाडेझुडपे आहे. जीव मुठीत घेवून रहावे लागत होते. साप, विंचू यासारख्या अनेक विषारी प्राण्यांचा सामना करावा लागला. आता मात्र विजेची सोय उपलब्ध झाल्याने आमच्या आदिवासी बांधवामध्ये आनंद पसरला आहे.
- शंकर येलय्या परचाके