दीड वर्षाच्या अंधारानंतर आला ‘प्रकाश’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:20 PM2018-01-01T23:20:50+5:302018-01-01T23:21:11+5:30
३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या घरगुती व कृषी ग्राहकांसाठी महावितरणने नवीन अभय योजना जाहीर केली होती.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : ३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या घरगुती व कृषी ग्राहकांसाठी महावितरणने नवीन अभय योजना जाहीर केली होती. या योजनेच्या माध्यमातून नवीन वर्षाचा पहिला दिवसच भिवापूर वॉर्डातील सय्यद अन्वर राजमोहम्मद खान यांच्या घरात प्रकाशाची किरणे घेऊन आला.
मोलमजुरी करून जगत असताना विजेच्या बिलाचे ११ हजार रुपये सय्यद अन्वर राजमोहम्मद खान यांच्याकडून थकित होते. आॅक्टोबर २०१६ मध्ये त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. बाबुपेठ शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता अमोल पिंपळे यांनी सयद अन्वर राजमोहम्मद खान यांना योजना समजावून सांगत योजनेत सहभागी करून घेतले. दोन हजार ३४० रुपये प्रति पहिल्या हप्त्याचे भरताच सहायक अभियंता अमोल पिंपळे यांनी त्यांच्या घरी प्रकाशाचे किरण पोहचवित नवीन वर्षाची भेट दिली. याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता वसंत हेडाऊ हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर योजनेनुसार ग्राहकाला मूळ थकबाकीची रक्कम पाच हप्त्यात भरण्याची सवलत आहे. तसेच थकीत रकमेवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे.
महावितरणच्या ज्या घरगुती व कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा ३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेला आहे. अशा ग्राहकांसाठी ही नवीन योजना असून योजनेत सहभागी होणाºया ग्राहकांच्या मूळ थकीत रकमेची पाच हप्त्यात विभागणी करून देण्यात येत आहे. त्यापैकी मूळ थकीत रकमेचा पहिला हप्ता व वीज जोडणीसाठी आवश्यक असणारी रक्कम भरल्यानंतर ग्राहकाचा वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. उर्वरित मूळ थकबाकीच्या चार हप्त्यांचा भरणा संबंधित ग्राहकाने मासिक वीज बिलासोबत भरणे आवश्यक आहे. ग्राहकांनी थकीत रकमेचा पूर्ण भरणा निर्धारित पाच हप्त्यात पूर्ण केला, तरच संबंधित ग्राहकाला थकीत रकमेवर व्याज व विलंब आकारात १०० टक्के माफी मिळणार आहे.