नेत्रदानातून दृष्टिहीनांच्या आयुष्यात प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:49 AM2019-08-30T00:49:25+5:302019-08-30T00:50:11+5:30
ज्यांची नेत्रबुब्बुळे (समोरील पारदर्शक भाग) निकामी झाली आहे. परंतु बाकीचा डोळा चांगल्या स्थितीत आहे. त्यांनाच दृष्टी प्राप्त होऊ शकते. कारण, नेत्ररोपण म्हणजे संपूर्ण डोळ्यांचे रोपण नव्हे, तर फक्त नेत्र बुब्बुळचे रोपण होय. यावर दुसरा कोणताही कृत्रिम उपाय नसून मृत व्यक्तीच्या नेत्रदानामुळे प्राप्त झालेल्या बुब्बुळाचे शस्त्रक्रियेद्वारे रोपण करणे, याला सर्वसाधारणपणे नेत्ररोपण असे म्हटल्या जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जगातील एकूण नेत्रहीन व्यक्तींपैकी २० टक्के म्हणजे सव्वाकोटी दृष्टिहीन भारतात आहेत. जिल्ह्यातही अशा व्यक्तींची संख्या वाढताना दिसते. त्यामुळे नेत्रदानातून दृष्टिहीनांच्या आयुष्यात प्रकाश पेरण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, या चळवळीत सहभागी होणे आता काळाची गरज झाली आहे.
ज्यांची नेत्रबुब्बुळे (समोरील पारदर्शक भाग) निकामी झाली आहे. परंतु बाकीचा डोळा चांगल्या स्थितीत आहे. त्यांनाच दृष्टी प्राप्त होऊ शकते. कारण, नेत्ररोपण म्हणजे संपूर्ण डोळ्यांचे रोपण नव्हे, तर फक्त नेत्र बुब्बुळचे रोपण होय. यावर दुसरा कोणताही कृत्रिम उपाय नसून मृत व्यक्तीच्या नेत्रदानामुळे प्राप्त झालेल्या बुब्बुळाचे शस्त्रक्रियेद्वारे रोपण करणे, याला सर्वसाधारणपणे नेत्ररोपण असे म्हटल्या जाते.
नेत्रदान हे रक्तदान याप्रमाणे जिवंतपणी नव्हे तर ते मरणोपरांत करायचे असते. कुठल्याही जिवंत व्यक्तीला नेत्रदान करता येत नाही. ३० लाख अंध व्यक्तींना दृष्टी देणे आपल्याला फारच सोपे वाटते. पण आरोग्य शास्त्राच्या दृष्टीने तस होत नाही. कारण नेत्रदानाबाबत असलेली अनास्था आणि मला काय त्याचे ही वृत्ती अद्याप संपलेली नाही.
दरवर्षी भारतात सुमारे ८० लाख मृत्यू होतात. परंतु यातील फक्त ५० हजार व्यक्तींचे नेत्रदान होते. भारतात जी नेत्ररोपणे होतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात दान केलेले नेत्र गोलक हे श्रीलंकेसारख्या आपल्या लहान शेजारी राष्ट्राकडून आलेले असतात. ही भयानक वस्तुस्थिती आहे. म्हणून दरवर्षी २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या पंधरवड्यात जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन शासनाकडून केल्या जाते.
नेत्रदान कोण करू शकतात?
नेत्रदानाला धार्मिक बंधन नाही. कुठलाही धर्म अशा महान कार्याला विरोध करत नाही. जन्मजात बालकापासून अगदी १०० वर्षांच्या स्त्री-पुरुषापर्यंत कोणाचेही नेत्रदान होऊ शकते. कुठल्याही प्रकारचा चष्मा लावणारे, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेले, मधुमेही आणि उच्च दाब रक्तदाब असलेले, नेत्रदान करू शकतात. मृत व्यक्तीला एड्स, गुप्तरोग, रेबीज, कावीळ, कर्करोग, धनुर्वात किंवा विषाणूपासून होणारे रोग तसेच नेत्रबुब्बुळाचे रोग असल्यास अशा व्यक्तीचे नेत्र रोपणासाठी निरूपयोगी ठरतात. परंतु ही नेत्रबुब्बुळे संशोधनासाठी वापरतात. तेव्हा अशा व्यक्तींचे नेत्रदान व्हावे की नाही, हे नेत्रसंकलन केंद्र किंवा नेत्रपेढीचे डॉक्टर ठरवतात. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे म्हणजेच नेत्र बुबुळ चांगल्या स्थितीत असल्यास स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने नेत्रदान होऊ शकते. ज्यांचे नेत्र बुबुळे चांगले आहे. परंतु इतर काही दोषांमुळे अंधत्व आले आहे. अशा अंधांचेही नेत्रदान होऊ शकते.
नेत्र संकलन चमू व डॉक्टर येईपर्यंतची खबरदारी
नोंदणीकृत डॉक्टरांकडून मृत्यू प्रमाणपत्र त्वरित मिळवावे. शक्यतो त्यांनाच १० सीसी रक्ताचा नमुना घेऊन ठेवण्यास सांगावे. मृताचे डोळे व्यवस्थित बंद करून पापण्यांवर बर्फ अन्यथा ओल्या कापसाच्या किंवा कापडाच्या घड्या ठेवाव्यात. शक्य असल्यास डोळ्यात अँटिबायोटिक ड्रॉप्स टाकावेत. पंखे बंद करावे व वातानुकूलित यंत्र असल्यास ते सुरू ठेवावे. मृत व्यक्तीचे डोके कुशीवर शरीरापासून १० इंच तरी उंच ठेवावे. मृत व्यक्ती शक्यतोवर कॉटवर ठेवावे. मृत व्यक्ती जेथे असेल तेथेच नेत्र बुबुळे काढण्याची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेला साधारणत: अर्धा तास लागतो. नेत्र काढल्यावर कृत्रिम नेत्र किंवा कापसाची बोळे घेऊन पापण्या व्यवस्थित ठेवल्या जातात. मृत व्यक्तीचा चेहरा विद्रूप होत नाही. हे नेत्र खास डब्यामध्ये नेत्रपेढी पाठवले जातात व त्यावर प्रक्रिया करून ४८ तास प्रतीक्षा यादीप्रमाणे दोन उपलब्ध नेत्रहीन व्यक्तीलाच बसविले जातात.