एलईडी बल्ब व्यवसायातून बचत गटाच्या महिलांच्या आयुष्यात प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:28 AM2021-04-04T04:28:57+5:302021-04-04T04:28:57+5:30

भोजराज गोवर्धन मूल (चंद्रपूर) : मनात असलेली जिद्द, चिकाटी आणि काही तरी वेगळ करून दाखविण्याची इच्छा असलेल्या मूल तालुक्यातील ...

Lighting the lives of self-help group women from the LED bulb business | एलईडी बल्ब व्यवसायातून बचत गटाच्या महिलांच्या आयुष्यात प्रकाश

एलईडी बल्ब व्यवसायातून बचत गटाच्या महिलांच्या आयुष्यात प्रकाश

Next

भोजराज गोवर्धन

मूल (चंद्रपूर) : मनात असलेली जिद्द, चिकाटी आणि काही तरी वेगळ करून दाखविण्याची इच्छा असलेल्या मूल तालुक्यातील भादुर्णा येथील महिलांनी पुढे येऊन एलईडी बल्ब आणि स्ट्रीट बल्ब तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. अतिशय जोखमीचा व्यवसाय करण्यास महिला पुढे सरसावल्याने या नावीण्यपूर्ण उपक्रमाची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा आहे.

बचत गटातील वेगवेगळ्या महिला एकत्र येऊन उमेदच्या माध्यमातून ग्रामसंघ तयार करण्यात आले. त्यातील अनेक महिलांना आपला एखादा व्यवसाय असावा अशी इच्छा होती. यासाठी मागील वर्षी वर्धा जिल्ह्यातील लोणीगाव येथील काही तज्ज्ञ प्रशिक्षक भादुर्णा येथे येऊन १५ महिलांना बल्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी एक टक्का व्याजाने ग्रामसंघाकडून ३५ हजार रुपयांचे कर्ज काढण्यात आले. ग्राम संघाच्या अध्यक्षा सुजीया टेकरे, कोषाध्यक्ष रेवता सोनुले यांच्या पुढाकारातून व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सहकार्याने एलईडी बल्ब आणि स्ट्रीट बल्बचा व्यवसाय सुरू केलेला आहे.

जिज्ञासा बल्ब उद्योग सुरू करण्यासाठी भादुर्णा येथील बालीशाही रायपुरे, उषा सत्येकार, सुजिया टेकरे, वनिता वाडगुरे, रेवता सोनुले, शुभांगी बोरूले, अल्का मडावी, वनमाला तोडासे, जयश्री सोनुले, कविता कोवे यांना बल्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या महिला आता भादुर्णा येथील सामाजिक सभागृहात ५ ते १५ वॅटचे एलईडी बल्ब आणि २४ ते ३६ वॅटचे स्ट्रीट बल्ब बनवीत आहे. तयार केलेले बल्ब आयोजित प्रदर्शनीमध्ये विक्रीसाठी ठेवतात, दुकानदारही महिलांकडून बल्ब घेऊन विक्री करतात. वॅटनुसार बल्बची किमत ग्रामसंघानी ठरविलेली आहे. महिलांनी उभारलेला हा नावीण्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात पहिला आहे. या उपक्रमाला मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे यासह अनेक अधिकाऱ्यांनी भेट देऊन स्तुती केली.

कोट

विजेशी सरळ संपर्क येत असल्यामुळे बल्ब तयार करण्यासाठी आधी मनात भीती वाटत होती; परंतु मागील वर्षभरापासून बल्ब बनविण्याचे काम आम्ही निरंकार करीत असल्याने आता भीती दूर झाली.

- बालिशाही रायपुरे, अध्यक्ष, जिज्ञासा लाईट उद्योग.

Web Title: Lighting the lives of self-help group women from the LED bulb business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.