चंद्रपूर जिल्ह्यात विजांचा पाऊस, 6 जणांचा मृत्यू; 10 जण जखमी
By राजेश भोजेकर | Published: July 26, 2023 08:19 PM2023-07-26T20:19:43+5:302023-07-26T20:20:11+5:30
मृतकांमध्ये चार महिला, शेतकरी व वनमजूर तर जखमींमध्ये चार मुली व पाच महिला.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी विजांचा पाऊस पडला. वीज पडून तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला. तर दहाजण गंभीर जखमी झाले. सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे दोन महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे एक महिला, पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा माल येथे एक महिला, कोरपना तालुक्यातील चनई(बु.) येथे तरुण शेतकरी तर गोंडपिपरी तालुक्यातील चिवडा वनक्षेत्रात वनमजुर अशा सहा जणांचा वीज पडून मृत्यू झाला. जखमींमध्ये जणांचा समावेश आहे. यामध्ये सिंदेवाही -१, नागभीड -३ व पोंभूर्णा तालुक्यातील सहा जणांचा समावेश आहे.
मृतकांमध्ये अंजना रुपचंद पुस्तोडे (४५) व कल्पना प्रकाश झोडे (४०) दोघीही रा. देलनवाडी ता. सिंदेवाही, प्रांजली ऊर्फ गीता पुरुषोत्तम ढोंगे (४१) रा. बेटाळा ता. ब्रह्मपुरी, पुरुषोत्तम अशोक परचाके (२५) रा. चनई बु. ता. कोरपना, गोविंदा लिंगा टेकाम(५४) रा. चिवडा ता. गोंडपिपरी, पोंभूर्णा तालुक्यातील घटनेत अर्चना मोहन मडावी (२७) रा. सास्ती (गौरी ) ता. राजुरा यांचा समावेश आहेत. जखमींमध्ये सुनीता सुरेश आनंदे (३५) रा. देलनवाडी ता. सिंदेवाही, शफिया सिराजूल शेख (१६) व महेक रफीक शेख (१६) दोघीही रा. नांदेड ता. नागभीड, रोहिणी विकास थेरकर (२०) रा. गिरगांव ता. नागभीड, खुशाल विनोद ठाकरे(२८), रेखा अरविंद सोनटक्के (४५), सुनंदा नरेंद्र इंगोले (४६), राधिका राहुल भंडारे (२०), वर्षा बिजा सोयाम (४७) व रेखा ढेकलू कुडमेथे (५५) सर्व वेळवा माल ता. पोंभूर्णा यांचा समावेश आहे.
सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी शिवारात सुरेश आनंदे यांच्या शेतात महिलावर्ग धान रोवणी करीत असताना दुपारी ३ वाजताच्या सुमारास विजांच्या
कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. अशातच वीज कोसळल्याची घटना घडली. यामध्ये अंजना रुपचंद पुस्तोडे व कल्पना प्रकाश झोडे यांचा जागीच मृत्यू झाला तर, सुनीता सुरेश आनंदे ही महिला गंभीर जखमी झाली. गिरगाव येथील रोहिणी विकास थेरकर (२०) ही गिरगाव-झाडबोरी मार्गावरील भिवानगर परिसरात रोवणीसाठी गेली असता विजांच्या कडकडाटाने शेतातच बेशुद्ध पडली. महिलांनी तिला नवरगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते.
ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा शेतशिवारात प्रांजली ऊर्फ गीता पुरुषोत्तम ढोंगे या महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. दुपारी ३ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाची रिपरिप सुरू झाली. गीता ढोंगे बेटाळा-पारडगाव रस्त्याच्या बाजूला शेतात काही महिला-पुरुषांसोबत रोवणी करण्यासाठी गेली होती. शेतातून परत येताना मेघगर्जना होऊन अचानक वीज कोसळली.
कोरपना तालुक्यातील खैरगाव (सावलहिरा) येथील शेतशिवारात पिकाला फवारणी करत असताना चनई बू. येथील पुरुषोत्तम अशोक परचाके या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाली. ही घटना दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या शेतकऱ्याचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.गोंडपिपरी तालुक्यातील करंजी उपवनक्षेत्रातील चिवडा कक्ष क्रमांक १३८ मध्ये रोपवनाचे काम करताना गोविंदा लिंगा टेकाम हा वनमजूर जागीच ठार झाला. इतर मजूर लांब अंतरात झाडाखाली थांबले होते. घटनेच्या २० मिनिटांपूर्वी पाऊस आला होता. थोडी उसंत घेऊन परत आलेल्या पावसात वीज पडून ही घटना घडली.
नागभीड तालुक्यातील नांदेड येथील शेतशिवारात रोवणी करून घराकडे परतताना अचानक वीज पडल्याने शफिया सिराजूल शेख (१६) व महेक रफीक शेख (१६) या मुली गंभीर जखमी झाल्या. दोघींवर तळोधी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून ब्रह्मपुरी येथे हलविले आहे.
पोंभूर्णा तालुक्यात पोंभूर्ण्यापासून अवघ्या चार किमी अंतरावरील वेळवा माल शेतशिवारात ढेकलू कुडमेथे यांच्या शेतात धान रोवणी करणाऱ्या शेतमजुरांवर वीज कोसळली. यात वडीलाकडे शेतीचे काम करण्यासाठी आलेल्या अर्चना मोहन मडावी या मुलीचा मृत्यू झाला तर सहा मजूर जखमी झाले. ही घटना दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास घडली. शेताच्या बाजूला खुशाल विनोद ठाकरे हे बैल चारत होते. तेही गंभीर जखमी झाले. खुशालला चंद्रपूरला उपचारार्थ हलविण्यात आले.
दैव बलवत्तर म्हणून ‘ते’ महिला-पुरुष बचावले
ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथील घटनेत गीता ढोंगे या महिलेसोबत आणखी सात-आठ महिला व चार-पाच पुरुष रोवणीचे काम करीत होते. अचानक पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट सुरु झाला. रोवणी थांबवून घरी परतण्यासाठी पायवाटेने निघाले. काही महिला-पुरुष समोर निघाले. गीता त्यांच्या मागे तर थोड्या अंतरावर इतर महिला-पुरुष होते. अचानक लख्ख प्रकाश पडला. काही कळायच्या आत वीज कोसळली. त्यात गीताचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दैव बलवत्तर म्हणूनच इतर महिला-पुरुष थोडक्यात बचावले.