लिंक फेलचा भुर्दंड अभिकर्त्यांवर !
By admin | Published: October 1, 2015 01:22 AM2015-10-01T01:22:08+5:302015-10-01T01:22:08+5:30
देशातील सर्व डाक कार्यालये संगणकीकृत होत असल्याने येथील कामेही आता आॅनलाईन होत आहेत.
तांत्रिक अडचणींचा फटका : डाक कार्यालयातील प्रकार
सास्ती : देशातील सर्व डाक कार्यालये संगणकीकृत होत असल्याने येथील कामेही आता आॅनलाईन होत आहेत. मात्र, राजुरा येथील डाक कार्यालयातील लिंक रोजच फेल राहात असल्याने अभिकर्त्यांनी आणलेले पैसे स्वीकारले जात नाही. त्यामुळे त्यांना रोजच पैसे परत न्यावे लागत आहे. एखाद्यावेळी अभिकर्त्यांच्या घरुन पैसे चोरीला गेल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच डाक विभागाच्या नियमानुसार दर महिन्यात २५ तारखेच्या आत पैसे भरावे लागतात. त्यानंतर आल्यास दंड बसतो. आता लिंक फेलमुळे जर पैसे उशिरा भरले जात असतील,तर अभिकर्त्यांनी दंड का भरावा, असा प्रश्नही विचारला जात आहे.
डाक विभागाने राजुरा येथील कार्यालयात २४ सप्टेंबरपासून आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु पहिल्या दिवसापासूनच येथील कर्मचाऱ्यांना व अभिकर्त्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लिंक नसणे, एरर येणे, लिंक असेल तर स्पीड कमी असणे अशा प्रकारच्या समस्या रोजच येत असल्याने अभिकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. महिन्याची शेवटची तारखी येऊन ठेपली असताना अभिकर्त्याजवळ लॉट व पैसे तयार असूनही तांत्रिक कारणांमुळे पैसे भरले जाऊ शकत नाही. हा महिना गेल्यास पुढील १ तारखेपासून पुन्हा त्यांना दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे आपली चूक नसतानाही दंड का भरावा, असा प्रश्न अभिकर्त्यांकडून विचारला जात आहे.
दरम्यान, आॅनलाईन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणीकरिता म्हैसूर येथे तक्रारी पाठविल्या आहे. त्याचे निराकरण लवकरच होणार आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली विभागातील काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्याची कल्पना आपणाला असून वरिष्ठांकडे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. राजुरा पोष्ट कार्यालयात लवकरच कर्मचारी देण्याचा प्रयत्न करु. ज्या एजन्टला पैसे भरण्यास अडचणी येत आहेत आणि ज्यांचा या महिन्यात आयडी आलेला नाही, अशा आरडी एजंटला पुढील महिन्यात ग्राहकांचे पैसे भरण्याची मुभा देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा दंड घेण्यात येणार नसल्याचेही डाक विभागाचे चंद्रपूर येथील वरिष्ठ अधिकारी शंभरकर यांनी सांगितले आहे.
मंगळवारी आॅनलाईन प्रक्रियेत तांत्रिक बिघाड आल्याने आरडी भरणाऱ्या एजंटमध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पैसे जमा न झाल्यास आर्थिक भुर्दंड बसणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)