तिवारींच्या हातात कमळ, डोडानींनी उचलले धनुष्य
By admin | Published: April 4, 2017 12:37 AM2017-04-04T00:37:20+5:302017-04-04T00:37:20+5:30
नामांकन सादर करण्याचा अखेरचा दिवस असलेला आजचा मंगळवार पक्षांतराचा दिवस ठरला.
काँग्रेसची सावध खेळी: अखेरच्या दिवशी पक्षांतराला उधाण
चंद्रपूर : नामांकन सादर करण्याचा अखेरचा दिवस असलेला आजचा मंगळवार पक्षांतराचा दिवस ठरला. अपेक्षित पक्षाकडून तिकीटा न मिळालेल्यांनी अचानकपणे अन्य पक्षात उड्या घेतल्याने मतदारही चाट झाले. काँगे्रसचे रामू उर्फ रितेश तिवारी यांनी अखेरपर्यंत किल्ला लढवूनही काँगे्रसचे तिकीट मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी ऐनवेळी भाजपाकडून महाकाली प्रभागातील तिकीट मिळविले. तर, बलराम डोडाणी यांना भाजपाने तिकीट नाकारल्याने त्यांनी ऐनवेळी शिवसेनेकडून बंगाली कँप प्रभागातून तिकीट पदरात पाडून घेतले. या सोबत, शिवसेनेच्या तिकीटावर विजयी होऊन शहराचे प्रथम उपमहापौर बनलेले संदीप आवारी यांनी धनुष्यबाण ठेवून कमळ हाती घेतले आणि भाजपाच्या पहिल्या उमेदवारी यादीत स्थान मिळविले.
चंद्रपूर महानगर पालिकेतील १७ प्रभागातील ६६ जागांसाठी सोमवारी नामांकन सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी अर्जांचा अक्षरश: पाऊस पडला. ५२७ नामांकन सादर झाले. भाजपाने सर्व ६६ जागांवर उमेदवार उभे केले. काँगे्रसने बंगाली कँप प्रभागातील महिला गटातील उमेदवार वगळता ६५ जागांवर उमेदवार उतरविले. राष्ट्रवादी काँग्रेसने ३१, शिवसेने ६१ तर मनसेने १७ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. या सोबतच विदर्भ माझा पार्टी प्रथमच रिंगणार उतरली असून ८ उमेदवार उभे केले आहेत.
नामांकन सादर करण्याचा अखेरचा दिवस अत्यंत धावपळीचा गेला. जवळपास सर्वच पक्षांनी अगदी अखेरच्या दिवशी उमेदवार जाहीर केल्याने तिकीट न मिळालेल्यांची प्रचंड धावाधाव झाली. शिवसेनेने सोमवारी दुसरी यादी जाहीर करताना प्रचंड गुप्तता पाळली. काँग्रसनेही नावे जाहीर करण्याऐवजी उमेदवारांच्या हातात थेट एबी फार्म सोपवून बंडखोरी टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. असे असले तरी तिकीट मिळणार नाही, याचा अंदाज आलेल्या अनेक पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी अन्य पक्षांशी तडजोड करून ठेवत तिकीटा पदरात पाडून घेतल्या. अशाच प्रकारातून शिवसेनेच्या कार्यालयापुढे दुपारी वातावरण तापलेले दिसले.
यावेळी प्रथमच तिकीटांसाठी सर्वच पक्षात प्रचंड चुरस दिसली. निवडणुकीतील तिकीटवापात यावेळी प्रचंड उलथापालथी दिसल्या. विद्यमान नगरसेवक आणि माजी झोन सभापती विनय जोगेकर यांना शिवसेनेने तिकीट नाकारून मनसेचे शहर उपाध्यक्ष अनिल बडवाई यांना तिकीट दिले आहे.
गेल्या वेळी जोगेकर यांच्याकडून त्यांचा केवळ १७ मतांनी पराभव झाला होता. बडवाईक यांची प्रभागातील पकड लक्षात घेवून शिवसेनेने त्यांना तिकीटाच्या दुसऱ्या यादीत स्थान दिले. माजी नगराध्यक्ष डॉ. सुरेश महाकुलकर तब्बल १० वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा काँगे्रसच्या तिकीटावर रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याच प्रभागातून काँग्रेसने उमाकांत धांडे यांच्या पत्नीला रिंगणात उतरविले आहे. भाजपाने विद्यमान नगरसेवक रविंद्र गुरनुले यांचे तिकीट कापून त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. सुभाष कासनगोट्टूवार यांनाही यावेळी भाजपाचे तिकीट मिळाले आहे. काँग्रेसने रत्नमाला बावणे यांचे तिकीट कापून महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे यांना तिकीट दिले आहे. यंदा प्रथमच एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा चढला आहे. या सोबतच राजकाराणालाही रंग चढायला लागल्याने वातावरणही अचानकपणे तापून उठले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
तिवारींना वगळून ‘त्या’ चार जणांना काँग्रेसची उमेदवारी
ज्या १२ नगरसेवकांच्या मुद्यावरून काँग्रेसमधील वातावरण प्रचंड तापले होते, त्या १२ नगरसेवकांच्या गटातील रामू तिवारी यांच्यासह आठ जणांना वगळता चार नगरसेवकांना तिकीटा मिळाल्या आहेत. या सर्वांना तिकीटा मिळव्या यासाठी आमदार वडेट्टीवार प्रचंड आग्रही होते. तर, माजी खासदार नरेश पुगलिया यांचाही तेवढाच विरोध होता. हा वाद मुंबईतून दिल्लीपर्यंत पोहचला. अखेर रामू तिवारी, संतोष लहामगे याच्यासह अन्य नगरसेवकांना वगळून तिकीटा देण्यावर पुगलिया राजी झाले. असे असले तरी संतोष लहामगे आणि मेहर सिडाम या दोघांऐवजी त्यांच्या पत्नीला तिकीट देवून हा वाद मंगळवारच्या मध्यरात्री शमविण्यात आला. यासोबतच, सुनिता अग्रवाल, अनिता कथडे आणि राजेश अडूर यांनाही तिकीटा देण्यात आल्या. वाटाघाटीदरम्यान तणावासारखी स्थिती निर्माण झाली होती. मात्र नरेश वरिष्ठ नेत्यांनी राजकीय चतुराई वापरत उद्भवू पहाणाऱ्या वादावर मात केली.
साखरकरांची पुन्हा घरवापसी
रामनगर प्रभागातील शिवसेना नगरसेवक आकाश साखरकर यांनी पक्षनेतृत्वाकडून योग्य सन्मान मिळत नसल्याचे कारण दर्शवित २५ मार्चला पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपाची वाट धरली होती. मात्र चार दिवसातच त्यांची घरवापसी झाली. शिवसेनेकडून त्यांना जटपुरा प्रभागातून तिकीट मिळाले. त्यामुळे त्यांचा रूसवा औंदघटकेचा ठरल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यात उमटत आहेत.
विदर्भ माझा पार्टी प्रथमच मैदानात
काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीसाठी काम करणाऱ्या स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेवून विदर्भ माझा पार्टीची जिल्ह्यात स्थापना केली. या पक्षाने यंदा प्रथमच मनपा निवडणुकीत उमेदवार उभे केले आहेत. अॅड. राजेश विराणी आणि सूर्यकांत चांदेकर यांच्या नेतृत्वात या पक्षाने ८ उमेदवार उभे केले असून हे दोघेही स्वत: रिंगणात आहेत. शिवसेनेचे विनय जोगेकरही या पक्षाच्या गळाला लागले आहेत.
सर्वांचे लक्ष महाकाली प्रभागाकडे
महाकाली प्रभागाकडे या वेळी सर्वांचेच लक्ष लागले आहे. स्थानिक राजकारणातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी पहिल्यांदाच एकाच प्रभागातून मात्र वेगवेगळ्या पक्षातून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. काँग्रेसकडून नंदू नागरकर आणि भाजपाकडून रामू तिवारी यांच्या उमेदवारीमुळे हा प्रभाग आतापासूनच ‘हॉट केक’ बनला आहे. अस्तित्वाच्या लढाईसाठी हे दोन्ही उमेदवार एकाच प्रभागातून रिंगणात असल्याने वादाच्या पार्श्वभूमीवर ही लढत लक्ष्यवेधी ठरण्याच्या मार्गावर आहे.
मतीन शेख अखेर रिंगणाबाहेर
काँग्रेसला रामराम करून भाजपात प्रवेशलेले मतीन शेख यांना अखेरच्या क्षणी रिंगणाबाहेर राहावे लागले. एमईएल प्रभागातून त्यांना तिकीट मिळणे अपेक्षित होते. त्यासाठी त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून प्रचंड तयारीही चालविली होती. मात्र अखेरच्या क्षणी त्यांचे तिकीट कटले. या सोबतच, जिल्हा मध्यवर्ती बँंकेचे अध्यक्ष: मनोहर पाऊणकर दोन दिवसांपूर्वी भाजपा नेत्यांच्या संपर्कात आले होते. वडगाव प्रभागातून स्वत:साठी अथवा पत्नीच्या तिकीटासाठी ते प्रयत्नशिल होते. मात्र या वेळी ते सुद्धा रिंगणाबाहेर आहेत. भाजपाच्या विद्यामान नगरसेविका वनश्री गेडाम यांनाही एमईएल प्रभागातून नकार मिळाला आहे. त्यांनी आपल्या वडीलांच्या उमेदवारीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न चालविले होते. मात्र त्याऐवजी दुसऱ्यालाच तिकीट मिळल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येवून प्रथम महापौर बनलेल्या विद्यमान नगरसेविका संगीता अमृतकर पुन्हा पक्षाकडे तिकीट मागतील असा अनेकांचा अंदाज होता. मात्र पक्षांतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वत:ला तिकीटाच्या स्पर्धेतून दूर ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.
डावललेल्यांनी ठोठावले शिवसेनेच दार
काँगे्रस आणि भाजपासारख्या पक्षातून डावलण्यात आलेल्या अनेक तिकीटेच्छुकांनी अखेरच्या क्षणी शिवसेनेचे दार ठोठावले. रात्री १२.३० वाजतानंतर शिवसेनेकडे अचानकपणे काँग्रेस आणि भाजपातील चांगल्या उमेदवारांची गर्दी वाढल्याने शिवसेनेच्या गोटात यामुळे काही काळ गोंधळ उडाला. या परिस्थितीत आपले तिकीट कापले जाणार की काय अशी भीती निर्माण झाल्याने शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांनी अख्खी रात्र फोनाफोनीत जागून काढली. अखेर बुधवारी दुपारी दुसरी यादी जाहीर करताना शिवसेनेने गुपचुप एबी फॉर्म सोपवून बंडखोरी आणि ओढाताण थांबविण्याचा प्रयत्न केला.
वडगाव प्रभागात माजी विरूद्ध आजी
वडगाव प्रभागात माजी नगराध्यक्ष विरूद्ध आजी महापौर असा सामना होऊ घातला आहे. भाजपाच्या तिकीटावर विद्यामान महापौर राखी कंचर्लावार उभ्या आहेत. तर, काँगे्रसकडून माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया आहेत. विशेष म्हणजे मनपाच्या राजकारणात अजिबात पटत नसलेल्या या दोन्ही महिला नगरसेविकांची लढत महत्वाची ठरणार आहे. काँगे्रसने अद्याप महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला नसला तरी सुनिता लोढीया यांचे नाव या पदासाठी शर्यतीत असल्याची चर्चा आहे. यामुळे ही लढतही रंगतदार ठरणार आहे.