दारूविक्रेत्या उमेदवाराला विरोध करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:35 AM2019-04-05T00:35:05+5:302019-04-05T00:36:15+5:30
श्रमिक एल्गार संघटना मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या कडक अंमलबजावणी तसेच यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी या मागणीसाठी प्रयत्न करीत असताना आता चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एका दारूविक्रेत्या उमेदवाराचाही कडाडून विरोध केला जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : श्रमिक एल्गार संघटना मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या कडक अंमलबजावणी तसेच यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी या मागणीसाठी प्रयत्न करीत असताना आता चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एका दारूविक्रेत्या उमेदवाराचाही कडाडून विरोध केला जाईल. यवतमाळ जिल्ह्यामध्ये दारूबंदीसाठी आंदोलन सुरू असताना एक दारुविक्रेता उमेदवार रिंगणात आहे. ही बाब महिलांसाठी अपमानास्पद आहे. त्यामुळे आता गावागावात कार्नर सभा घेऊन या दारूविक्रेत्या उमेदवाराविरुध्द श्रमिक एल्गार संघटना प्रचार करेल, अशी माहिती श्रमिक एल्गारच्या संस्थापक तसेच चंद्रपूर जिल्हा दारूबंदी समितीच्या अॅड. पारोमिता गोस्वामी, तसेच यवतमाळ येथील स्वामीनी दारूबंदी समितीचे महेश पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.
मुख्यमंत्र्यांनी दारूबंदीसंदर्भात कडक कायदे करण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही, तर पुन्हा १५ आॅगस्टपासून जेलभरो आंदोलनाचे हत्यार उपसणार, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी झाली. मात्र कडक अंबलबजावणी होत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. जून महिन्यामध्ये होणाऱ्या अधिवेशनात दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी कडक कायदे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारूबंदीसाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून दारूबंदी संदर्भात प्रस्ताव शासन सादर करेल, असेही आश्वासन दिले. दरम्यान, जूनमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्यास १५ आॅगस्टपासून पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपासणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. विशेष म्हणजे, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दारूबंदीसह अन्य मागण्या मान्य असून पुढील काळात त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याचे अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने दारूबंदीसंदर्भात ठोस आश्वासन दिले नाही. एवढेच नाही, तर काही दिवसांपूर्वी चंद्रपुरात अॅड. प्रकाश आंंबेडकरांची सभा झाली. यामध्ये त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नसल्याने त्यांच्या पार्टीचा विचारच केला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.दरम्यान, चंद्रपूर श्रमिक एल्गारने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसून श्रमिक एल्गारचे सदस्य आपल्या सदसद्विवेकबुद्धीने उमेदवारांना मतदार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याचवेळी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील भाजपा उमेदवाराच्या कोणत्याही सभा, बैठकांमध्ये आपण तसेच सदस्य जाणार नाही. मात्र कार्नर सभा घेऊन जमेल तसा दारुविक्रेत्या उमेदवाराविरुद्ध प्रचार करू, असेही अॅड. गोस्वामी यांनी यावेळी स्पष्ट केले.