मोहफुल व काजूच्या बोंडापासून तयार होणाऱ्या मद्याला आता 'विदेशी' दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 01:35 PM2022-07-02T13:35:45+5:302022-07-02T13:40:02+5:30
सन २००५ पासून काजू बोंड व मोहफुलापासून बनविण्यात येणारे मद्य देशी मद्य म्हणून घोषित करण्यात आले. आता या मद्याला विदेशी मद्य असा दर्जा दिला जाणार आहे.
प्रवीण खिरटकर
वरोरा (चंद्रपूर) : राज्यात मदय प्रामुख्याने मळी व धान्यापासून तयार केले जाते. त्यापासून पेय तयार केले जाते. सन २००५ पासून काजू बोंड व मोहफुलापासून बनविण्यात येणारे मद्य देशी मद्य म्हणून घोषित करण्यात आले. आता या मद्याला विदेशी मद्य असा दर्जा दिला जाणार आहे.
मोह वृक्ष हे केवळ भारतीय उपखंडात आढळून येत असून राज्यातील जंगलात मोह वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळून येतात. राज्यात मोहफुलाच्या आयातीवर बंदी असल्याने मोहफुलापासून मद्य बनवण्याची प्रक्रिया खर्चिक असल्याने ती परवडत नाही. या मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर इतर मद्याच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे अनेकजण मोहफुलापासून देशी मद्य तयार करण्याकरिता इच्छुक होत नाही. मोहफुलापासून वेगळ्या प्रकारच्या मद्यनिर्मितीस परवानगी दिल्यास मोहफुलाची मागणी वाढून आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे एक स्त्रोत तयार होईल तसेच भारतामध्ये काजू उत्पादनात महाराष्ट्र अग्रगण्य राज्य आहे.
काजू उत्पादक प्रक्रियेत केवळ काजू बी विचारात घेतली जाते. तथापि काजू बोंडावर अपेक्षित प्रक्रिया केली जात नसल्याने ती वाया जाते. अशा वाया जाणाऱ्या काजू बोंडांपासून मद्य तयार करून त्यापासून मद्य निर्मिती झाल्यास शेतकरी काजू बोंडे गोळा करणाऱ्या महिला स्वयंसहाय्यता गट यांना देखील उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत तयार होईल. मद्यार्क निर्मिती प्रक्रियेमध्ये मद्याव्यतिरिक्त पशुखाद्य, कंपोस्ट खत तयार होऊन त्याचा फायदा संबंधित शेतकरी आणि उत्पादकांना होईल. आता या मद्याला देशीऐवजी विदेशी दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.