पाण्याच्या बाटलीखाली दारूची तस्करी, चार जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 05:00 AM2021-04-30T05:00:00+5:302021-04-30T05:00:23+5:30
नागपूरवरून खांबाडा मार्गे एक चार चाकी वाहन आणि त्याच्या समोर पायलटिंग करणारी एक कार चंद्रपूरकडे दारूसाठा नेत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खंबाडा चेक पोस्ट गाठले आणि त्या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांसह नाकाबंदी केली असता सर्वप्रथम हुंडाई कंपनीची कार क्रमांक एम. एच. ४९ बिके ३०३५ समोरून येताना दिसली. पोलिसांनी ते वाहन अडविले आणि त्याची तपासणी केली असता कार चालक नीलेश सुखदेव सलोटे याच्यासह कारमधून एक लाख रुपये नगदी आणि महागडे मोबाइल ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतानासुद्धा अवैध दारू विक्रेते नवनवीन शक्कल लढवून अवैध दारू मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पुरवठा करीत आहेत. वरोरा पोलिसांनी बुधवारी एका कारवाईत २९ लाख ९६ हजार रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल जप्त केला.
नागपूरवरून खांबाडा मार्गे एक चार चाकी वाहन आणि त्याच्या समोर पायलटिंग करणारी एक कार चंद्रपूरकडे दारूसाठा नेत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खंबाडा चेक पोस्ट गाठले आणि त्या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांसह नाकाबंदी केली असता सर्वप्रथम हुंडाई कंपनीची कार क्रमांक एम. एच. ४९ बिके ३०३५ समोरून येताना दिसली. पोलिसांनी ते वाहन अडविले आणि त्याची तपासणी केली असता कार चालक नीलेश सुखदेव सलोटे याच्यासह कारमधून एक लाख रुपये नगदी आणि महागडे मोबाइल ताब्यात घेतले.
त्यापाठोपाठ लेलँड कंपनीचे चार चाकी वाहन क्रमांक एमएच ०४ एटी २७०४ पोलिसांना येताना दिसले. त्या वाहनाची तपासणी केली असता वरच्या भागात बिसलेरी पाण्याच्या बाटल्या तर आतमध्ये देशी दारूने भरलेल्या १५० पेट्या पोलिसांना आढळल्या. बिसलेरी बाटल्यांचा देखावा करून ही अवैध दारू आरोपी चंद्रपूरकडे नेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी या प्रकरणी राहील सलीम खान पठाण, शेख जुबेर शेख गुलाल आणि रंजीत चंद्रमणी मेश्राम (सर्व राहणार नागपूर) यांना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी ८ लाख ७० हजार रुपयांची दारू व मुद्देमालासह २९ लाख ९६ हजार रुपयांचा माल जप्त केला.
पोलीस हवालदार प्रदीप पाटील यांनी फिर्याद नोंदवली, तर उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, प्रदीप पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
दारू मालकाचे नाव लपविण्यासाठी पोलिसांचे हात ओले?
ही दारू चंद्रपुरातील एका बड्या नेत्याची असल्याची चर्चा दारू पकडल्यानंतर सुरू झाली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. ही दारू ते चंद्रपूरला घेऊन जात असल्याचे सांगत आहेत. ही दारू कोणाकडे चालली हेदेखील वरोरा पोलिसांना माहिती असताना पोलीस दारू मालकाचे नाव लपवित असल्याचे समजते. नाव लपविण्यासाठी वरोरा पोलिसांचे हात ओले केल्याची चर्चा आहे.