सहा वर्षांच्या दारूबंदीमुळे कायद्याच्या कचाट्यात अडकली दारू दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:35+5:302021-06-06T04:21:35+5:30
दारूबंदी उठल्यापासून शासनाच्या अधिसूचनेकडे लिकर लाॅबीचे लक्ष लागले आहेत. शासन चंद्रपूर जिल्ह्यातील दारूची दुकाने सुरू करण्यासाठी नेमके कोणते निकष ...
दारूबंदी उठल्यापासून शासनाच्या अधिसूचनेकडे लिकर लाॅबीचे लक्ष लागले आहेत. शासन चंद्रपूर जिल्ह्यातील दारूची दुकाने सुरू करण्यासाठी नेमके कोणते निकष लावते. यावरही लिकर लाॅबी बारीक लक्ष ठेवून आहे. अधिसूचनेनुसार पुन्हा नव्याने हालचाली कराव्या लागतील, अशी एकूणच स्थिती असल्याचे सांगितले जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पूर्वी असलेले बियर बार, देशी दारूची दुकाने, बियर शाॅपी व वाइन शाॅपी ही दारू दुकाने दारूबंदीनंतर एकाएकी बंद झाली. यानंतर चंद्रपुरातील दारूबंदी उठणार आणि आपण आपले दुकान पूर्ववत सुरू करू, या आशेवर काहींनी दारू दुकाने बंद ठेवून ‘वेट ॲन्ड वाॅच’ची भूमिका स्वीकारली, तर काहींनी आता चंद्रपुरातील दारूबंदी उठणे अशक्यप्राय असल्याचे समजून आपले परवाने इतर जिल्ह्यांत वळते केले. ज्यांनी दारू दुकाने बंद ठेवली. त्यांना आपला परवाना रद्द होण्याची भीती वाटत आहे, तर काहींना मंत्रालयस्तरावरून परवाना नूतनीकरण करावा लागेल, असे वाटू लागले आहे. ही बाब लिकर लाॅबीची घालमेल वाढविणारी असल्याचे बोलले जात आहे. ज्यांनी आपले परवाने इतर जिल्ह्यांत वळते केले. त्यांनाही पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यात परवाने वळते करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे समजते. या एकंदर बाबींसाठी शासनाची अधिसूचना केव्हा येते आणि त्यामध्ये काय नवे निकष येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.