साक्षरता ही काळाची गरज- विखार
By Admin | Published: September 22, 2015 01:44 AM2015-09-22T01:44:18+5:302015-09-22T01:44:18+5:30
साक्षरता ही काळाची गरज असून आजच्या काळात विविध पद्धतीने साक्षर होणे गरजेचे आहे. त्यामध्ये राजकीय साक्षरता व
ब्रह्मपुरी : साक्षरता ही काळाची गरज असून आजच्या काळात विविध पद्धतीने साक्षर होणे गरजेचे आहे. त्यामध्ये राजकीय साक्षरता व संगणकसाक्षरता अतिशय आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी महापुरुषांपासून प्रेरणा घेऊन आपल्या जवळच्या एक व्यक्तीला तरी साक्षर करावे, असे प्रतिपादन प्राचार्य रवींद्र विखार यांनी केले.
निरंतर प्रौढ शिक्षण व विस्तार सेवा अंतर्गत लोकसंख्या शिक्षण मंडळ आणि महिला अध्ययन व सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयामध्ये साक्षरता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून बोलताना गोविंदराव मुनघाटे यांनीही आपले विचार केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. कोकाडे होते तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. डी. ए. पारधी, लोकसंख्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मोहन कापगते, महिला अध्ययन व सेवा केंद्राचे प्रभारी प्रा. अजित खाजगीवाले उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे यांनी विद्यार्थ्यांना साक्षरतेचे महत्व पटवून सांगितले. याप्रसंगी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त झाल्याबद्दल प्रा. डॉ. रविंद्र विखार यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक आणि उपक्रमाबद्दलची माहिती प्रा. डॉ. मोहन कापगते यांनी दिली तर संचालन प्रा. पद्माकर वानखेडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)