साहित्यिकांची लेखनी ठरत आहेत जनजागृतीचे माध्यम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:20+5:302021-06-06T04:21:20+5:30
चंद्रपूर : कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अन्न, वस्त्र, निवारा या सोबतच आता आरोग्य ही ...
चंद्रपूर : कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अन्न, वस्त्र, निवारा या सोबतच आता आरोग्य ही मूलभूत गरज बनली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात समज-गैरसमज व भीतीदायी वातावरण असताना, जिल्ह्यातील साहित्यिकांनी कोरोनाविरुद्ध युद्ध पुकारून लेखनीतून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. वेदनांना कवींच्या आशेच्या शब्दांचा आधार दिलासा देणारा ठरत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात फिनिक्स साहित्य मंच, चंद्रपूर व पंचायत समिती गोंडपिपरीद्वारा जिल्ह्यातील लेखक, कवींना कोरोना जनजागृतीसाठी लिहिते केले. साहित्यिकांचे शब्दांना जनजागृतीचे माध्यम बनविले. ‘संदेश कोरोना लसीकरणाचा’ या शीर्षकाखाली तीन ऑनलाइन कविसंमेलने पार पाडली. समाजमाध्यमातून कवितांना व्यापक प्रसिद्धी देऊन जिल्ह्यातील कवी, लेखकांना कोरोना योद्ध्याची भूमिका देऊन जनजागृती करवून घेतली.
सहा. गटविकास अधिकारी धनंजय साळवे, फिनिक्स साहित्य मंचाचे अध्यक्ष नरेशकुमार बोरीकर, विजय वाटेकर यांनी ‘आरोग्यावर बोलू काही’ या कोरोनाविरुद्ध एकूण ५२ जनजागृतीच्या कवितांचे संपादन पुस्तक रूपात केले. कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांत जनजागृती व्हावी, यासाठी नुकतेच ‘पुन्हा श्वास घेण्यासाठी’ या १९ कवींच्या कवितांचे पुस्तकरूपाने फिनिक्सतर्फे कवी धनंजय साळवे, नरेशकुमार बोरीकर, अविनाश पोईनकर, गोपाल शिरपूरकर यांनी संपादन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, गटविकास अधिकारी शेषराव बुलकुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके यांनी साहित्याद्वारे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
जिल्ह्यातील कवी सुरेंद्र इंगळे, संतोषकुमार उईके, जयवंत वानखेडे, मिलेश साकुरकर, सुनील बावणे, अरुण घोरपडे, पंडित लोंढे, राजेंद्र घोटकर, नरेंद्र कन्नाके, राजेंद्र पोईनकर, सुधाकर कन्नाके, संभाशिव गावंडे, बी.सी. नगराळे, शीतल धर्मपुरीवार, रोशनकुमार पिलेवान, प्रदीप देशमुख, किशोर चलाख, अरुण झगडकर, दुशांत निमकर, मीना बंडावार, प्रवीण आडेकर, दीपक शीव, अमित महाजनवार, नितीन जुलमे, सुनील कोवे, सुनील पोटे, वैशाली दीक्षित, चंद्रशेखर कानकाटे, ईश्वर टापरे यांनी कोरोना जनजागृती व लसीकरणासाठी लेखन करून योगदान दिले आहे.
कोट
सध्याच्या काळात जिल्ह्यातील कवी, लेखकांची लेखणी कोरोना निर्मूलन व लसीकरणासाठी जनजागृतीचे प्रभावी माध्यम असून, यातून जनतेतील गैरसमज दूर होऊन आशावाद निर्माण होईल. या उपक्रमातील कविता व संपादित पुस्तके समाजाला प्रेरणादायी व दिशादर्शक आहे.
- धनंजय साळवे,
संयोजक तथा सहा.गट विकास अधिकारी, गोंडपिपरी