जिल्हा परिषदेत साहित्य खरेदी घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:38 AM2019-05-03T00:38:59+5:302019-05-03T00:39:23+5:30
चंद्रपूर जिल्हा परिषदेत कोट्यवधी रुपयांचा साहित्य खरेदी घोटाळा झाल्याची बाब उजेडात आली आहे. साहित्य पुरवठा कंत्राटदाराने चक्क खोटे टेस्टींग रिपोर्ट सादर करून जिल्हा परिषद प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून हा घोटाळा केल्याची धक्कादायक माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेत कोट्यवधी रुपयांचा साहित्य खरेदी घोटाळा झाल्याची बाब उजेडात आली आहे. साहित्य पुरवठा कंत्राटदाराने चक्क खोटे टेस्टींग रिपोर्ट सादर करून जिल्हा परिषद प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून हा घोटाळा केल्याची धक्कादायक माहिती आहे.
आपली शुद्ध फसवणूक होत असल्याची बाब लक्षात येताच जिल्हा परिषदेच्या पंचायत विभाग व आरोग्य विभागाने आपापल्या पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यात आल्या. शिवाय कंत्राटदाराचे मधाचे बोट घेतलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाहीदेखील करण्यात आली आहे.
या प्रकरणी रामनगर पोलिसांनी दोन्ही तक्रारींवरून मे. वर्धमान मार्केटींगविरुद्ध ४ व २५ एप्रिल रोजी कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपींना अद्यापही मोकाटच सोडले आहेत.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागाला लागणाºया साहित्याची खरेदी ही निविदा काढून कंत्राटदारामार्फत केली जात आहे. कंत्राटदाराने पुरवठा केलेल्या साहित्याची तांत्रिक तपासणी ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत करण्यात येते. जोपर्यंत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्या स्वाक्षरीनिशी प्रमाणपत्र देत नाही, तोपर्यंत हे साहित्य जिल्हा परिषद प्रशासना वा संबंधित विभाग हे साहित्य उपयोगात आणूच शकत नाही. चंद्रपूर जिल्हा परिषदेने हे साहित्य पुरवठा करण्याचे कंत्राट चंद्रपुरातील मे. वर्धमान मार्केटींग चंद्रपूर या कंपनीला दिलेले आहेत.
या कंपनीने जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या मागणीनुसार पुरवठा केलेल्या साहित्याचा टेस्टींग रिपोर्ट (तांत्रिक तपासणी प्रमाणपत्र) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून प्राप्त होणे अपेक्षित होते. मात्र सदर कंपनीने हे पुरवठा केलेल्या साहित्याचा परस्पर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या खोट्या स्वाक्षरीचा तांत्रिक तपासणी अहवाल सादर करून जिल्हा परिषदेला सादर केला. ही बाब लक्षात येताच जिल्हा परिषद प्रशासन खळबडून जागे झाले. जि.प. प्रशासनाने या प्रमाणपत्राची संबंधितांकडून शहानिशा केली असता कंत्राटदाराने सादर केलेला टेस्टींग रिपोर्ट खोटा असल्याची बाब निदर्शनास आली.
यानंतर जिल्हा मुख्य अधिकारी राहुल कार्डिले यांनी संबंधित विभागामार्फत पोलीस ठाण्यात तक्रारी सादर करण्याचे निर्देश दिलेत. तसेच ज्यांनी हा टेस्टींग रिपोर्ट स्वत: न आणता कंत्राटदारावर विश्वास टाकून त्यांच्यामार्फत मागविला अशा जि.प.च्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आल्याचे समजते.
आरोपींना अटक न केल्यास आंदोलन - मनसे
सदर साहित्य खरेदीत कंत्राटदाराने खोटे टेस्टींग रिपोर्ट सादर करून जिल्हा परिषद प्रशासनाची दिशाभूल केली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने फसवणुकीचा अहवाल सादर केल्यानंतरच हा गुन्हा दाखल झाला असताना पोलिसांनी ४ एप्रिल व २५ एप्रिलला तक्रार केल्यानंतरही सदर कंपनीच्या संचालकाला अद्यापही अटक केली नाही. यावरून पोलिसांवर संशय येत असल्याचा आरोप मनसेचे जिल्हा संघटक राजू कुकडे यांनी पत्रकार परिषदेत केला. अटक न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
घोटाळा चार कोटींच्या घरात
जि.प.पंचायत विभागाने एक कोटीपेक्षा अधिक किमतीचे साहित्य सदर कंत्राटदारामार्फत मागविले होते. शिक्षण विभागाने सुमारे तीन कोटींचे साहित्य मागविले होते. तर आरोग्य विभागाने सुमारे १९ लाखांवर किमतीचे साहित्य मागविले, अशी माहिती जि.प.सूत्राने दिली. या साहित्याचे खोटे टेस्टींग रिपोर्ट सदर कंत्राटदाराने सादर करून जि.प. प्रशासनाची शुद्ध फसवणूक केल्याचे समजते.
साहित्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
जिल्हा परिषदेला मागणीनुसार कंत्राटदाराने पुरवठा केलेल्या साहित्याच स्वत:च खोटा टेस्टींग रिपोर्ट सादर केल्यामुळे या साहित्याच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. हा प्रकार केव्हापासून सुरू आहे. आतापर्यंत सदर कंत्राटदाराने किती खोटे अहवाल सादर करून जिल्हा परिषदेची शुद्ध फसवणूक केली. तपास रामनगर पोलिसांवर करीत आहेत.
ग्रामीण रुग्णांच्या आरोग्याशी खेळ
सदर कंत्राटदाराने आरोग्य विभागात लागणाºया साहित्याचा पूरवठा केलेला आहे. त्याने पुरवठा केलेले साहित्य हे प्रमाणित नसेल तर या साहित्याच्या वापरामुळे रुग्ण दगावण्याची भीती आहे. एकूणच मधाचे बोट चाटून असलेली जिल्हा परिषदेच्या संबंधित यंत्रणेचे या घोटाळ्याने पितळ उघडे पडले आहे.