वसतिगृहातील मुलांचे जीवन धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:45 PM2018-10-24T22:45:34+5:302018-10-24T22:45:57+5:30
गोंडपिपरी येथील शासकीय औद्योगिक संस्थेच्या वसतिगृहात ४० विद्यार्थी राहतात. मात्र या वसतिगृहात अनेक समस्या उदभवत असून प्राचार्य व गृहपाल याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
आक्सापूर : गोंडपिपरी येथील शासकीय औद्योगिक संस्थेच्या वसतिगृहात ४० विद्यार्थी राहतात. मात्र या वसतिगृहात अनेक समस्या उदभवत असून प्राचार्य व गृहपाल याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. खिडक्यांचा काचा फुटल्या असून सभोवताल अनावश्यक झुडुपे वाढली आहेत. यामुळे वसतिगृहातील मुलांचे जीवन धोक्यात आले आहे.
गोंडपिपरी हे तालुक्याचे ठिकाण असून येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. येथे प्रशिक्षण घेण्याकरिता दुरून विद्यार्थी येत असतात. यात सिंदेवाही, चिमूर, नागपूर येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बाहेर गावच्या विद्यार्थ्यांसाठी आयटीआयला लागूनच मुलांचे वसतिगृह आहे. परंतु या वसतिगृहाची स्थिती अत्यंत दयनीय असून अशा केविलवाण्या परिस्थितीत विद्यार्थी आपल्या भावी आयुष्याचे स्वप्न बघत राहत आहेत. अनेक वर्षांपासून वसतिगृहातील खोल्यांमधील खिडक्यांच्या काचा पूर्णपणे तुटलेल्या आहेत. विद्यार्थी स्वत:च्या सुरक्षेसाठी वर्तमानपत्र वा काहीतरी वस्तू खिडक्यांना लावून खिडक्या बंद करून झोपतात. वसतिगृहाच्या सभोवताल अनावश्यक झुडुपे वाढलेली आहेत. अनेकदा तिथून साप, विंचू या सारखे सरपटणारे प्राणी विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये येतात, अशी धक्कादायक माहितीसुद्धा मिळालेली आहे. विद्यार्थ्यांना झोपण्याकरिता असलेल्या गाद्यासुद्धा कुजलेल्या आहेत. कित्येक वर्षांपासून त्या बदलविण्यात आल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर त्याचा फार मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
वसतिगृहाच्या दुरुस्ती व देखभालासंदर्भात आमच्याकडे कुठलाच फंड येत नाही. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे असून त्यांनी याकडे लक्ष द्यावे.
- प्राचार्य नंदूरकर,
आयटीआय, गोंडपिपरी.