कोरोना काळात रस्त्यावर भटकणाऱ्यांचे जीवन संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:26 AM2021-05-01T04:26:36+5:302021-05-01T04:26:36+5:30
बल्लारपूर : मागच्या वर्षी कोरोना काळाच्या पहिल्या टप्प्यात रस्त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब कुटुंबांना मदत करणाऱ्यांची संख्या खूप होती. यामुळे ...
बल्लारपूर : मागच्या वर्षी कोरोना काळाच्या पहिल्या टप्प्यात रस्त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब कुटुंबांना मदत करणाऱ्यांची संख्या खूप होती. यामुळे हातावर आणून खाणाऱ्यांची फार मोठी सोय झाली होती. परंतु, दुसऱ्या टप्प्यात मात्र रस्त्यावर भटकणाऱ्या गरीब कुटुंबांची फार गैरसोय होत आहे.
कोणीच त्यांना जीवनावश्यक वस्तूंची कीट आणून देत नाही आहे. जिकडे-तिकडे संचारबंदीचे सावट असल्यामुळे कोणतीही दुकाने उघडी नाही. घराचे दरवाजे बंद, मदत मागायची तर कोणाला? असा प्रश्न या गरीब ज्येष्ठ नागरिकांना पडलेला आहे.
स्वयंसेवी संघटनाही याबाबत काही बोलत नाही. किंवा प्रशासनानेही अशी कोणती व्यवस्था केली नाही. मागच्या वर्षी मात्र अशा गरजूंची नगर प्रशासनाने काळजी घेतली होती, तर इतर संघटनांनी किराणा साहित्य देऊन भरभरून मदत केली होती. शहरात रस्त्यावर फिरून जीवन जगणारे असे खूप ज्येष्ठ महिला पुरुष आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे. यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी समोर येण्याची गरज आहे.