पिण्याच्या पाण्यात वाढताहेत जीवेघेणे घटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:45 PM2017-10-22T23:45:01+5:302017-10-22T23:45:13+5:30
भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असतानाच दुसरीकडे नैसर्गिक भूजलस्त्रोत प्रदूषित होत आहेत.
राजेश मडावी।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असतानाच दुसरीकडे नैसर्गिक भूजलस्त्रोत प्रदूषित होत आहेत. परिणामी, पिण्याच्या पाण्यात जीवघेण्या हानीकारक घटकांची सातत्याने वाढ होत असल्याचे जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालातून पुढे आले आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१७ पर्यंत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांतून ७ हजार ९९३ नमुन्यांची तपासणी झाली. यामध्ये ९४८ नमुने दुषित आढळले. या दुषित पाण्यामुळे किडणी, हृदयरोग, फुप्फुस आणि अन्य विविध असाध्य आजारांचे प्रमाण वाढून अकाली मृत्यू ओढवू शकतो. मात्र, स्वत:हून पाणी तपासणीसाठी येणाºयांची संख्या अतिशय चिंताजनक असल्याचे अहवालातून दिसून आले.
दैनंदिन जीवनात पिण्याकरिता वापरण्यात येणारे पाणी शुद्ध की अशुद्ध, याची तपासणी करण्याच्या हेतूने राज्य शासनाने चंद्रपुरात जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेची उभारणी केली. मुख्य अणुजीव शास्त्रज्ञांच्या नेतृत्वातील या प्रयोगशाळेत आरोग्य विभागासह शासनाचे विविध विभाग, वेकोलि, नगरपरिषद, ग्रामपंचायत आणि खासगी कंपनी अथवा व्यक्तींनी आणलेले पाण्याचे नमुने तपासून घेण्याची आधुनिक सुविधा आहे. रासायनिक व जैविक अशा दोन प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. खासगी कंपनी व व्यक्तींकडून नाममात्र शुल्क आकारल्या जाते. २०११ ते सप्टेंबर २०१७ पर्यंत तपासलेल्या पाणी नमुन्यांवर दृष्टिक्षेप टाकल्यास जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत वर्षागणिक दूषित होत असल्याचे अहवालातून दिसून आले आहे. मार्च २०१२ ला शहरी विभागातून तपासलेल्या ५ हजार ६४३ नमुन्यांमध्ये २९८ नमुने दुषित ( ५. २७) टक्के आढळले होते. सप्टेंबर २०१७ मध्ये तपासलेल्या ३ हजार ३८५ नमुन्यांमधून २३८ नमुने (७. ०९ टक्के) मानवी आरोग्यासाठी घातक सिद्ध झाले होते. ग्रामीण भागात २०११- २०१२ या वर्षात २१ हजार ७०८ नमुन्यांपैकी २ हजार ६८० नमुने (५. २७ टक्के) घातक निघाले. सप्टेंबर २०१७ पर्यंत ४ हजार ०६ पैकी ७१० नमुने (१५.४०) टक्के दुषित आढळले. तपासणीदरम्यान दुषित निघालेल्या पाण्यात मानवाला घातक ठरू पाहणारे घटक वर्षांगणिक वाढतच आहेत. त्यामुळे पाणी तपासणी करणे आणि दुषित घटकांपासून जलस्त्रोत सुरक्षित ठेवणे किती महत्त्वाचे आहे, याकडेही हा अहवाल लक्ष वेधून घेतो. जलजागृती तसेच पाणी तपासणीसाठी स्थानिक स्वराज संस्था तसेच सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला नाही, तर येत्या काही वर्षांत जलजन्य आजारांपासून बळी जाणाºयांचे प्रमाण पुन्हा वाढू शकते.
हॉटेल मालकांकडून पाणी तपासणीला ठेंगा
चंद्रपूर शहर आणि तालुकास्तरावरील बहुतेक हॉटेलचालक तसेच पाण्याचा व्यवसाय करणाºया व्यापाºयांकडून पाण्याची तपासणीच केली जात नाही. जिल्हा प्रयोगशाळेत नाममात्र शुल्क स्वीकारून पाणी तपासणीची सुविधा असताना हेतुपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन निर्देश दिल्याने आरोग्य केंद्र, महानगर पालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींचे शेकडो नमुने दररोज तपासणीसाठी आणल्या जात आहेत. मात्र, पाण्याचा गोरखधंदा करणाºया व्यापाºयांनीच या तपासणीला ठेंगा दाखविला आहे.
११ निकषांवर होते जैविक तपासणी
पाण्याची जैविक तपासणी करण्यासाठी ११ निकष आहेत. रासायनिक तपासणीसोबतच जैविक तपासणी गरजेची असून त्याद्वारे पाण्यातील जीवघेण्या घटकांचे विश्लेषण केले जाते. त्यानुसार आरोग्यपूरक घटकांना सामावून घेण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत अथवा संस्थांना शिफारशी केल्या जातात. एप्रिल ते सप्टेंबर २०१७ पर्यंत जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत ७१ नमुन्यांची तपासणी झाली. त्यातील २० नमुने हानीकारक आढळले.
बहुतेक आजार पाण्यापासूनच होतात. तपासणीतील ९४८ नमुन्यांत जीवघेणे घटक आहेत. त्यामुळे पाणी तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. रासायनिक व जैविक या दोन्ही तपासण्या करून कुटुंब, शहर व गावाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे महत्त्व मोठे आहे. या प्रयोगशाळेतून पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी केली पाहिजे.
- सी. जी. परुळकर, मुख्य अनुजीव शास्त्रज्ञ