लॉयड मेटलच्या कामगारांत संतापाची लाट
By admin | Published: April 5, 2017 12:37 AM2017-04-05T00:37:17+5:302017-04-05T00:37:17+5:30
येथील लॉयड मेटल या कच्चा लोखंड कारखाना व्यवस्थापनाकडून दिवसेंदिवस कामगार विरोधी धोरण राबविण्यात येत असल्याने कामगारांत असंतोष खदखदत आहे.
काम बंद आंदोलन : व्यवस्थापन दखल घेईना
घुग्घुस : येथील लॉयड मेटल या कच्चा लोखंड कारखाना व्यवस्थापनाकडून दिवसेंदिवस कामगार विरोधी धोरण राबविण्यात येत असल्याने कामगारांत असंतोष खदखदत आहे. याविरोधात दहा-बारा दिवसांपुर्वी शिवसेनेने आंदोलन केले. तर आता ठेकेदारी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. मात्र व्यवस्थापन कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेत का नाही, असा संतप्त सवाल कामगारांनी केला आहे. मात्र या क्षेत्राच्या नेत्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे.
मागील तीन महिन्यांपुर्वी कारखान्यात कार्यरत कामगार युनियनने व्यवस्थापनाशी वाटाघाटी करून करार केला. झालेल्या करारानुसार वेतन वाढ केली व वेतन वाढ दिली. मात्र अजूनही थकबाकी दिली नाही. वेतन वाढीपासून एरियस न देता एक वर्षाचा एरियर्स देण्याच्या मन:स्थितीत व्यवस्थापन आहे. मात्र कामगार वेतन वाढीपासून एरिअर्स देण्याची मागणी करीत आहेत. एरियसच्या बाबतीत कामगारात संभ्रम आहे. सोमवारी कारखान्याच्या आत कामगारांनी काम बंद आंदोलन केले. यात सुमारे चारशे कामगारांनी भाग घेतला. रात्री उशिरापर्यंत कामगार व व्यवस्थापनाची संयुक्त बैठक झाली. मात्र ती निष्फळ ठरली. तरी आश्वासन दिल्यानंतर रात्रीच्या सी पाळीत कामगारांनी काम सुरु केले. सोमवारी ठरल्याप्रमाणे मंगळवारी सकाळी बैठक होणार होती; मात्र सायंकाळपर्यत उभय पक्षात बैठक झाली नव्हती. (वार्ताहर)