एकाच निबंधकावर तीन तालुक्यांचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:32 AM2021-08-21T04:32:04+5:302021-08-21T04:32:04+5:30
रत्नाकर चटप नांदा फाटा : जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, जिवती या तीनही तालुक्यांचा भार एकाच दुय्यम निबंधकांवर असून, गेल्या ...
रत्नाकर चटप
नांदा फाटा : जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, जिवती या तीनही तालुक्यांचा भार एकाच दुय्यम निबंधकांवर असून, गेल्या अनेक दिवसांपासून खरेदी-विक्री व्यवहार संथगतीने होताना दिसत आहेत.
कोरपना व जिवती येथे स्थायी दुय्यम निबंधकांची नियुक्ती अद्यापही करण्यात आलेली नाही. नागरिकांना विक्री पत्र करण्यासाठी, तसेच इतर कामासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. यातच आता खरेदी-विक्रीचे व्यवहार ऑनलाइन पद्धतीने असल्यामुळे कधीकधी तांत्रिक अडचणींमुळे एक दिवसाचे काम लांबणीवर जात असल्याची ओरड नागरिक करीत आहेत. राजुरा, कोरपना, जिवती या तीनही तालुक्यांना एकाच निबंधकाचे दोन-दोन दिवस दिले असल्याने आठवडाभराची कामे दोन दिवसांत कशी पूर्ण करता येतील, असा सवाल आता पुढे येत आहे. यातच नागरिकांना आर्थिक, तसेच मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. या तीनही तालुक्यांतील दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची चक्क झुंबड उडालेली दिसत असून, सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडालेला कार्यालयात दिसत आहे. काम लवकर करून घरी परत जाण्याच्या मानसिकतेत नागरिक मोठ्या प्रमाणात कार्यालयात गर्दी करीत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होताना होत आहे. तेव्हा जिवती, कोरपना तालुक्यात दुय्यम निबंधकांची स्थायी नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.