कर्जवसुलीसाठी सावकाराने चंद्रपूरमध्ये दोघांना घरासह पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 07:42 AM2019-05-08T07:42:51+5:302019-05-08T07:44:53+5:30
कर्जाच्या वसुलीसाठी गेलेल्या सावकाराने कर्जदार कुटुंबीयांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना घरासह पेटवून दिल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी दुपारी चंद्रपुरात घडला.
चंद्रपूर : कर्जाच्या वसुलीसाठी गेलेल्या सावकाराने कर्जदार कुटुंबीयांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना घरासह पेटवून दिल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी दुपारी चंद्रपुरात घडला. यामध्ये हरीणखेडे कुटुंबातील दोघांसह संबंधित सावकारही गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
रघुनाथ व कल्पना हरीणखेडे या शिक्षक दाम्पत्याने जसबीर सिंग या सावकाराकडून १० टक्के व्याजाने ३ लाख रुपये घेतले होते. पैकी २ लाख रुपये मुद्दल व १ लाख २० हजार रुपये व्याज अशा ३ लाख २० हजार रुपयांची परतफेड केली. उर्वरित १ लाख रुपये देणे बाकी होते. त्यासाठी जसबीर सिंग सोमवारी हरीणखेडे यांच्या घरी गेला, तेव्हा मंगळवारी सायंकाळी ६० हजार रुपये देऊ असे त्यांनी त्याला सांगितले.
मात्र जसबीर आज दुपारीच पुन्हा घरी गेला. संध्याकाळी पैसे मिळतील असे सांगताच, जसबीरने आणलेले पेट्रोल घरभर शिंपडून जळती काडी घरात फेकली. आगीचा भडका उडून घराने पेट घेतला. त्यात कल्पना हरीणखेडे (५४) व मुलगा पीयूष (२६) हे गंभीररीत्या भाजले. सावकारही जखमी झाला. त्या वेळी रघुनाथ हरीणखेडे घरात नव्हते.
आक्रोश ऐकून परिसरातील लोकांनी घराकडे धाव घेतली. लोकांनी कल्पना व पीयूष यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. जसबीर सिंग स्वत:च रुग्णालयात गेला. अग्निशमन विभागाने आग विझवली. जसबीर सिंगला अटक करण्यात आली आहे.
का केले हे कृत्य?
बेकायदा सावकारी कारणाऱ्या जसबीर सिंगला हरीणखेडे कुटुंब कजाची वेळेवर परतफेड करीत होते. उर्वरित रक्कम आज सायंकाळी देण्याचे कबुल केले असताना त्याने घरावर पेट्रोल टाकून मायलेकरांना जीवे मारण्याचा प्रयत्न का केला? यामागे त्याचा काही वाईट हेतू होता का? पैसे मागायला जाताना तो पेट्रोल का घेऊन गेला? या प्रश्नांचा छडा पोलिसांना लावावा लागेल.