महिला बचत गटांना शून्य दराने कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2017 12:32 AM2017-04-30T00:32:52+5:302017-04-30T00:32:52+5:30
पदराच्या गाठीला पैसा जमवण्याचा व कुटुंबाला आवश्यक असताना खर्च करण्याचे कौशल्य बाळगणाऱ्या महिलांची आर्थिक आघाडीवरील पत वाढली आहे.
पंकजा मुंडे : पोंभुर्णा येथे महिला बचतगट मेळावा
चंद्र्रपूर : पदराच्या गाठीला पैसा जमवण्याचा व कुटुंबाला आवश्यक असताना खर्च करण्याचे कौशल्य बाळगणाऱ्या महिलांची आर्थिक आघाडीवरील पत वाढली आहे. महिला कधीच कोणाचे कर्ज अंगणावर ठेवत नाही. यापुढे राज्य शासनाकडे महिला बचत गटांना शून्य टक्के दराने विनाअट कर्ज देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी पोंभुर्णा येथे केले.
महिला आर्थिक विकास मंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पोंभूर्ण्याच्या कार्यक्रमात उभय नेते सहभागी झाले होते.यावेळी राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभूर्ण्याच्या महिला बचत गटाची चळवळ राष्ट्रीयस्तरावर पोहचविण्याचे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, नगरपंचायत अध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती सभापती अल्काताई आत्राम, उपसभापती विनोद देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राहुल संतोषवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, हरीष शर्मा, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी एम.आर.दयानिधी, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे, बचत गटाची चळवळ राबविणा-या आशा भडके आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, या छोटयाशा तालुक्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून फार मोठे काम सुरु आहे. त्याची दखल मी घेतली असून महिला बचत गटांनी कुक्कुट पालन, दुग्ध व्यवसाय आदी व्यवसाय करावे, याकरिता आवश्यक तेवढी मदत केली जाईल. पुढच्या पाच वर्षांत पोंभुर्णा तालुक्यातील महिला बचत गटाच्या महिला आर्थिक दृष्टया सक्षम व कर्त्या महिला बनतील, अशी मी आशा करतो.
त्यांना पुरुषापुढे पैशासाठी हात पसरावा लागणार नाही, इतकी आर्थिक सक्षमता त्यांच्यात येईल, अशी मला अपेक्षा आहे.
हा तालुकयावेळी महिला बचत गटामध्ये काम करणा-या सक्रिय महिला सदस्यांच्या पतींचा ‘ज्योतीबांचा सत्कार’ म्हणून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात वेगवेगळया जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिला बचत गटांच्या सदस्या, आदिवासी गावातील महिला सरपंच व लक्ष्मीकांत भडके, कविता मडावी, सुलभा जुन्नावार, अरविना दुतकोवर, नीलम इटकलवार, सुमित्रा जुमनाके, उर्मिला मार्गोनवार यांचाही सत्कार करण्यात आला.(प्रतिनिधी)