मूल येथील लोकवस्तीतील दारू दुकान शहराबाहेर न्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:16+5:302021-06-04T04:22:16+5:30

मूल : शासनाने नुकतीच चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठवली असल्याने येत्या काही दिवसात दारूची दुकाने सुरू होणार आहेत. तशी ...

The local liquor store in Mul should be taken out of town | मूल येथील लोकवस्तीतील दारू दुकान शहराबाहेर न्यावे

मूल येथील लोकवस्तीतील दारू दुकान शहराबाहेर न्यावे

Next

मूल : शासनाने नुकतीच चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठवली असल्याने येत्या काही दिवसात दारूची दुकाने सुरू होणार आहेत. तशी लगबग सुरू झाली आहे. मात्र मूल शहरात असलेल्या भरवस्तीतील दारू दुकानामुळे जनतेला त्रास सहन करावा लागणार आहे. दारू व्यवसायामुळे होणारा जनतेचा त्रास आणि महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन सुरू होणारी दारूची दुकाने शहराबाहेर सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बजरंग सेनेनी केली आहे.

जिल्ह्यात झालेल्या दारूबंदीमुळे अनेक गैरकृत्याला चालना मिळाली होती. त्यामुळे जनतेची मागणी आणि वास्तविक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने जिल्ह्यातील दारूबंदी हटविली. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात पुन्हा अधिकृतरित्या दारूची दुकाने सुरू होणार आहेत. याची संधी साधून काही दारू विक्रेते मूल शहरात वर्दळीच्या व भरगच्च लोकवस्ती असलेल्या महर्षी वाल्मीकी वाॅर्ड क्र. ६ व ७ येथे पूर्वीच्याच ठिकाणी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात दारूबंदी होण्यापूर्वी सदर वाॅर्डात रहदारीच्या मुख्य मार्गावर तीन दारूची दुकाने होती. या तिन्ही दारू दुकानांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होता. संध्याकाळच्या सुमारास या दुकानांसमोर दारू शौकिनांची प्रचंड गर्दी राहत असल्याने दारू दुकानासमोरच्या मार्गाने जाण्यास महिलांना असुरक्षित वाटत होते. मार्गावरील गर्दीमुळे वाहन चालकांनाही जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागायचे. गर्दीमुळे या दुकानांसमोर दोनदा जीवघेणे अपघातही झाल्याची वास्तविकता आहे. त्यामुळे येत्या काळात सुरू होणारे दारू दुकान लोकवस्तीपासून दूर अंतरावर सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी स्थानिक बजरंग सेनेचे अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, निकेश सुखदेवे, पंकज शेन्डे, जगदीश टिंगुसले, आकाश शेंडे आदींनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Web Title: The local liquor store in Mul should be taken out of town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.