स्थानिकांना मिळणार रोजगाराच्या नव्या संधी
By admin | Published: March 27, 2017 12:44 AM2017-03-27T00:44:02+5:302017-03-27T00:44:02+5:30
मोहफुले हे वनोपज वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त करण्यात येत असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
सुधीर मुनगंटीवार : मोहफुले वनविभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त
चंद्रपूर : मोहफुले हे वनोपज वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त करण्यात येत असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
विधानसभेत नियम ४७ अन्वये त्यांनी यासंबंधीचे निवेदन केले. स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याकरिता हे पाऊल उचलल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
एकट्या गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलांचे अंदाजे उत्पादन एक लाख टन असून त्यापासून २०० कोटी रुपयांच्या वर बाजारपेठ निर्माण होईल एवढी क्षमता आहे.
तथापि कायदेशीर बंधनामुळे त्याचा निश्चित व्यापार होण्यास आणि स्थानिकांना त्याचा लाभ मिळण्यास अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन मोहा फुले विषयाचा अभ्यास करण्यासाठी सचिव वने, यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती.
या समितीने सादर केलेला अहवाल शासनाने मंजूर केला असून या अहवालातील शिफारसी नुसार भारतीय वन अधिनियम १९२७ कलम-४१ (३) व त्या अनुषंगाने महाराष्ट्र वन नियम २०१४ चे नियम ३१ (इ) मधील सर्व शक्तीचा वापर करून शासनाने मोह फुले या वनोपजास वन विभागाचे वाहतूकीचे नियम लागू राहणार नाहीत असा निर्णय घेतला आहे.
त्याशिवाय मोहफुले साठवणूक क्षमतेबाबतची बंधने शिथील करणे, मोहफुलाचा व्यापार खुला करणे याबाबतची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लवकरच अपेक्षित आहे. असे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. (नगर प्रतिनिधी)
अनेकांचे उत्पन्नाचे साधन
महाराष्ट्रात विदभार्तील सर्व जिल्ह्यांसह वन तसेच शेती क्षेत्रात मोठा वृक्ष जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यापासून मिळणारे मोह फुल हे पौष्टिक खाद्य पदार्थ असून त्याचा व्यवसाय हा शेतीपूरक जोडधंदा म्हणून केला जातो. हे त्यांच्या उत्पन्नाचे एक साधन आहे.