गुगल मॅपमध्ये चुकीच्या स्थानी चुकीच्या स्थळांचे लोकेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 12:20 PM2024-09-19T12:20:36+5:302024-09-19T12:21:52+5:30

नवे मार्गदेखील अपडेट नाही: अधिकच्या अंतराचे दाखवले जातात मार्ग

Location of wrong places in wrong place in google map | गुगल मॅपमध्ये चुकीच्या स्थानी चुकीच्या स्थळांचे लोकेशन

Location of wrong places in wrong place in google map

लोकमत न्यूज नेटवर्क 
कोरपना:
गुगल मॅप ही गुगलने विकसित केलेली मोफत ऑनलाइन नकाशा सेवा आहे. ज्याचा उपयोग विविध स्थानांची नकाशावर माहिती शोधण्यासाठी व मार्गदर्शन मिळवण्यासाठी होतो. यामध्ये रस्ते शहर, गावे, हॉटेल, दुकाने, पर्यटनस्थळे इत्यादींची माहिती मिळते. तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शनसुद्धा मिळते. यात वाहतुकीची स्थिती, सार्वजनिक वाहतूक सायकलिंग पादचारी मार्ग इत्यादींची माहिती असते. परंतु, कोरपना तालुक्यात गुगलने मॅप केलेली बरीचशी माहिती चुकीचे मार्गदर्शन करणारी आढळली आहे.


परिणामी गुगलच्या आधारावर मार्गदर्शन मिळवणे अडचणीचे ठरते आहे. या दृष्टीने गुगल मॅपमध्ये सुधारणा करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कोरपना तालुक्याला लागून असलेली तेलंगणा राज्याची सीमासुद्धा महाराष्ट्राच्या हद्दीत आली आहे. त्यामुळे नेमका हा भूभाग महाराष्ट्राचा की तेलंगणाचा हे कळायला मार्ग नाही. याचबरोबर अनेक गावांचे लोकेशन गाव एकीकडे आणि लोकेशन दुसऱ्या गावाकडे असे अंकित केले. यात प्रामुख्याने तालुक्यातील सावलहिरा, टांगाळा, थिप्पा, खैरगाव, येरगव्हान, कोडशी खू, पिपरी, झोटिंग, कमलापूर, हातलोणी, कुकुटबोडी, केरामबोडी यासह अनेक गावाचा समावेश आहे. यातही बऱ्याच गावांचे लोकेशन दोन स्थाने दर्शविली आहेत. ज्यामध्ये कन्हाळगाव, अंतरगाव आदीसह अनेक गावे आहेत


एक वर्ष होऊन अधिक कालावधी लोटूनसुद्धा सावलहिरा-येलापूर, पारडी-खातेरा मार्ग रहदारी योग्य होऊनसुद्धा अपडेट झाले नाही. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला रस्ता शोधायचा असल्यास दुसरा दूरच्या अंतरावरीलच मार्ग दाखवला जातो. तालुक्यातील प्रमुख असलेल्या मार्गापैकी गडचांदूर-धानोरा फाटा मार्गावर ही पैनगंगा रोड म्हणून अंकित केले आहे. परिणामी चुकीची माहिती प्रसारित होत आहे. कोरपना वणी राज्य महामार्ग क्रमांक २३६ चे राज्य महामार्ग क्रमांक ३७४ मधे परावर्तित होऊनसुद्धा जुनाच २३६ क्रमांक दाखवला आहे. देवाडा-गडचांदूर- अंतरगाव-वनोजा-आबाई फाटा मार्गावर ही राज्य महामार्ग क्रमांक ३१७ म्हणून रेखांकित करण्यात आले नाही. तालुक्यातील अनेक भागांत नव्याने बदल झाले आहे. परंतु, गुगलच्या नकाशात ते बदलसुद्धा होणे बाकी आहे. त्यामुळे अद्ययावत माहिती मिळत नाही. या अनुषंगाने गुगलने पुन्हा नव्याने अचूक माहिती साठवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ही स्थिती जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील अनेक गावांची आहे. 


फेसबुकच्या करंट व होमटाऊन लोकेशनमध्ये कोरपना नाही 
सोशल मीडिया माध्यमातील फेसबुक हे एक आघाडीचे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. मात्र, या प्लॅटफॉर्ममध्ये व्यक्तीचे करंट व होमटाऊन लोकेशन दर्शवायचे असल्यास ज्यामध्ये कोरपना शहर येत नाही. त्यामुळे अन्यत्र शहराची माहिती द्यावी लागते आहे. तालुक्यातील गडचांदूर व आवारपूर ही ठिकाणे दर्शवून आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरपनासह अन्य लोकेशन अद्यावत करण्याची आवश्यकता आहे.
 

Web Title: Location of wrong places in wrong place in google map

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.