लॉकडाऊन ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 05:00 AM2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:01:28+5:30
जीवनावश्यक वस्तु वगळता कोणत्याही नवीन दुकानांना परवानगी देण्यात आली नाही. जिल्ह्यांमधील लॉकडाऊन जैसे-आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारी दिली. शहरांमध्ये कृष्ण नगर भागात एक पॉझिटिव्ह रूग्ण आढळला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील कृष्ण नगर भागातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाला. या रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्याच्या संपर्कात आलेल्या ४६ जणांची सूची करण्यात आली आहे. संशयितांचे १० स्वॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. पैकी ६ नमुने निगेटीव्ह आले. कंटेनमेंट झोनमध्ये १४ दिवस सर्वांच्या ये-जावर पूर्णत: बंदी आहे. जीवनावश्यक वस्तु वगळता कोणत्याही नवीन दुकानांना परवानगी देण्यात आली नाही. जिल्ह्यांमधील लॉकडाऊन जैसे-आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारी दिली.
शहरांमध्ये कृष्ण नगर भागात एक पॉझिटिव्ह रूग्ण आढळला आहे. हा रूग्ण रात्रपाळी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्या संपूर्ण इमारतीलाही सील करण्यात आले आहे. रूग्णाची दर तासाला तपासणी केली जात असून प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे या संदर्भातील कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी केले.
कृष्णनगर वस्तीच्या आसपास असणाऱ्या इंदिरानगर, शास्त्रीनगर, बंगाली कॅम्प परिसराला प्रशासनाने सील केले. महानगर पालिकेने दिलेल्या परवानगी पासेसशिवाय कुणालाही या परिसरात जाता येणार नाही. आरोग्य तपासणी व नोंदी घेणे सुरू असून याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असेही जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी सांगितले. अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात मजूर गावागावात परत जात आहेत. सर्वांना होम क्वारंन्टाइन करण्यात आले. जिल्ह्यात अडकून पडलेल्या अन्य राज्यातील मजुरांना पाठविण्याची मोहीम सुरू आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था,अनेक संघटना प्रशासनाला मदत करीत आहे. मात्र ही मोहीम सुरू असताना नागरिकांनी बाहेरून येणाऱ्यांशी पुढील काही दिवस संपर्क टाळावे. कुणाची प्रकृती बिघडल्यास प्रशासनाला कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले.
१४ उपनिबंधक कार्यालये सुरू
चंद्रपुरातील सह दुय्यम निबंधक वर्ग २ चंद्रपूर व चंद्रपूर-२ या दोन कार्यालयांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील १४ तालुक्यातील दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयातील स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहाराला सोमवारपासून सुरूवात झाली. कोरोना पार्श्वभूमीवर केवळ चंद्रपुरातील दोन कार्यालय पुढील आदेशापर्यंत बंद राहतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
आदेशापूर्वीच उघडली दुकाने
चिमूर : जिल्हा प्रशासनाकडून आदेश नसताना सोमवारी अनेक दुकाने सकाळी १० वाजतापासून सुरू उघडल्याचा प्रकार सोमवारी घडला. जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. शासनाने ग्रीन व ऑरेज झोनसाठी काही सवलती जाहीर केल्या. मात्र प्रशासनाने रविवारपर्यंत कोणताच आदेश काढला नव्हता. ४० दिवसांपासून लॉकडाऊन असलेले शेकडो नागरिक सोमवारी थेट रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले.