चंद्रपुरात प्लास्टिक बंदीला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:58 PM2018-06-23T22:58:32+5:302018-06-23T22:59:26+5:30

राज्य शासनाने संपूर्ण राज्यातच शनिवारपासून सरसकट प्लास्टिक बंदी लागू केली. याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या. मात्र या निर्णयाला चंद्रपुरातील व्यावसायिकांनी खो देत प्लास्टिकचा वापर सुरूच ठेवला.

Locked plastic banned in Chandrapur | चंद्रपुरात प्लास्टिक बंदीला खो

चंद्रपुरात प्लास्टिक बंदीला खो

Next
ठळक मुद्देवापर सुरूच : मनपाच्या कारवाईत प्रचंड उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाने संपूर्ण राज्यातच शनिवारपासून सरसकट प्लास्टिक बंदी लागू केली. याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या. मात्र या निर्णयाला चंद्रपुरातील व्यावसायिकांनी खो देत प्लास्टिकचा वापर सुरूच ठेवला. महानगरपालिकेच्या कारवाईत उद्देशापेक्षा औपचारिकताच दिसून आली. केवळ २७ हजारांचा दंड ठोठावून मनपा प्रशासन गप्प बसले. त्यामुळे शनिवारी दिवसभर अनेक ठिकाणी प्लास्टिकचा वापर सुरूच राहिला.
मागील काही वर्षात प्लास्टिकचा वापर चांगलाच वाढला आहे. हे प्लास्टिक नष्ट होत नसल्याने ते शहरात, गावागावात विखुरलेले असतात. यामुळे प्रदूषणात वाढ होऊन जनावरांनाही धोका निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने अनेक महिन्यांपूर्वीच प्लास्टिक बंदीची घोषणा केली होती. प्लास्टिकचे उत्पादक, वितरक व व्यावसायिकांना त्यांच्याजवळील प्लास्टिकचा स्टॉक संपवून दुसरा पर्याय शोधण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. तरीही प्लास्टिकचा स्टॉक संपला नाही. उलट तो आणखी वाढताना दिसून येत होता. त्यामुळे शासनाने २३ जूनपासून प्लास्टिक बंदीच्या कडक अंमलबजावणीची घोषणा केली. कोणी या नियमाचे उल्लंघन करून प्लास्टिक वापरताना दिसून आला, तर पहिल्यांदा पाच हजार, दुसऱ्यांदा दहा हजार व तिसºयांदा २५ हजार रुपयांचा दंड व तीन महिन्यांचा शिक्षा, असे कायदेशीर प्रावधान केले आहे.
सोशल मीडियासह विविध माध्यमांवर याबाबत जोरदार जनजागृती झाली. असे असतानाही चंद्रपुरात शनिवारी अनेक ठिकाणी या नियमाचे उल्लंघनच होताना दिसून आले. गोलबाजार, महात्मा गांधी मार्ग, कस्तुरबा मार्ग, तुकूम परिसर, दाताळा मार्ग परिसर, वरोरा नाका, रामनगर, बंगाली कॅम्प, भानापेठ परिसर, बागला चौक परिसर, बाबुपेठ यासह शहरातील जवळजवळ सर्वच भागातील अनेक व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्याचा वापर सुरू होता. विशेष म्हणजे, सक्त कारवाईच्या सूचना दिल्यानंतरही अनेक भागात मनपाचे अधिकारी भटकले नाही.
जिल्हाभर तशीच परिस्थिती
शनिवारपासून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी होणार होती. मात्र जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायत व ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी प्लास्टिकचा वापर होताना दिसून आला. ब्रह्मपुरीसह काही नगरपालिकेने शनिवारी केवळ ध्वनीक्षेपकाद्वारे शहरात जनजागृती करून कडक कायद्याविषयीची माहिती दिली. प्लास्टिकचा वापर करू नका, अन्यथा हजारो रुपये दंड वसूल केला जाईल, असा केवळ इशारा दिला.
पाच लाख लोकसंख्येच्या शहरात २७ हजारांचा दंड
चंद्रपूरची लोकसंख्या पाच लाखाच्या घरात पोहचली आहे. शहराचा विस्तारही वाढला आहे. आज प्लास्टिक बंदीच्या कडक अंमलबजावणीचा पहिला दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करून व्यावसायिकांवर वचक बसविणे आवश्यक होते. मात्र मनपाचे अधिकारी व कर्मचारी शहरातील अनेक भागात पोहचू शकले नाही. मनपाला लागूनच असलेला गांधी चौक, गोलबाजार व महात्मा गांधी व कस्तुरबा मार्गावरील व्यावसायिकांचीच मनपा अधिकाऱ्यांनी तपासणी करून शंभर किलो प्लास्टिक जप्त केले. यावेळी व्यावसायिकांकडून २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई मनपाचे सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, अतिक्रमण विभागाचे प्रमुख नामदेव राऊत, स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे व कर्मचाºयांनी केली.

Web Title: Locked plastic banned in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.