अधिवेशनासाठी शिक्षकांचे शाळेला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:15 PM2018-11-23T22:15:27+5:302018-11-23T22:15:43+5:30
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरुड रोड येथील सर्व शिक्षक शाळा कुलूप बंद करुन बुद्धगया येथील अधिवेशनाला गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर राहावे लागले. मात्र पंचायत समिती सदस्यांच्या समय सूचकतेने शाळेत दुसरा शिक्षक पाठवून शाळा पूर्ववत सुरु करण्यात आली. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरुड रोड येथील सर्व शिक्षक शाळा कुलूप बंद करुन बुद्धगया येथील अधिवेशनाला गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर राहावे लागले. मात्र पंचायत समिती सदस्यांच्या समय सूचकतेने शाळेत दुसरा शिक्षक पाठवून शाळा पूर्ववत सुरु करण्यात आली. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राजुरा तालुक्यातील वरूर रोड येथे इयत्ता १ ते ४ थी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेतील सर्व शिक्षक सुट्टी घेवून बुद्धगया (बिहार) येथे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाकरिता गेले. या चार शिक्षकी शाळेत एकूण ७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेतील सर्व शिक्षक अधिवेशनाला गेल्याने शाळेची वेळ होऊनही शाळा बंदच होती. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांची वाट पाहात शाळेबाहेर ताटकळतच उभे होते. हा सर्व प्रकार पं. स. सदस्य रामदास पुसाम यांच्या लक्षात येताच त्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी चंद्रपूरच्या जि. प. शिक्षण विभागात संपर्क केला. त्यानंतर राजुरा येथील शिक्षणाधिकारी पुरुषोत्तम भिवगडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून येथील शाळेवर दुसऱ्या शाळेतील शिक्षक पाठविण्याचे सांगितले. परंतु, सदर शिक्षक शाळेची वेळ होऊनही शाळेत हजर झाले नसल्याने विद्यार्थी शाळेबाहेर ताटकळत होते. त्यानंतर पं. स. सदस्याच्या तक्रारीनंतरच शिक्षक शाळेत हजर झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळले. पं. स. सदस्य रामदास पुसाम यांनी शिक्षण विभागासोबत संपर्क साधला नसता तर शाळा दिवसभर बंद राहिली असती.
नोकारी (पालगाव) शाळा बंद
बिहार राज्यातील बुद्धगया येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाकरिता कोरपना तालुक्यातील नोकारी (पालगाव ) येथील शिक्षक गेल्याने शाळा दिवसभर बंद होती. परिणामी विद्यार्थ्यांना शिक्षकांची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागले. मात्र शिक्षक आले नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे शिक्षण विभाग काय कार्यवाही करते, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.