लोहार डोंगरीवासीय विविध समस्यांनी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:23 PM2018-02-28T23:23:22+5:302018-02-28T23:23:22+5:30
लोहार डोंगरी हे गाव ब्रह्मपुरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर तसेच तळोधी (बा.) वनपरिक्षेत्राच्या अगदी टोकावर वसले आहे.
आॅनलाईन लोकमत
तळोधी (बा.): लोहार डोंगरी हे गाव ब्रह्मपुरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर तसेच तळोधी (बा.) वनपरिक्षेत्राच्या अगदी टोकावर वसले आहे. मात्र, शासनाच्या विविध योजना अद्याप पोहोचल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
लोहार डोंगरी हे गाव किटाळी बोद्रा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येते. गावाची लोकसंख्या जेमतेम ५८ आहे. १२ घरांच्या या वसतिमध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. गावाला जाण्यासाठी मुख्य रस्ता नाही. नागरिकांना तळोधी (बा.) येथील जाण्याकरिता पायवाट रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. वन्य प्राण्यांच्या संचारामुळे रात्री घराबाहेर निघणे शक्य होत नाही. गावाच्या सभोवताल घनदाट जंगल व्यापले आहे. लोहारडोंगरी गावात वाघ, चितळ, डुक्कर, अस्वल, हरीण आणि अन्य वन्यप्राण्यांचा सतत संचार सुरू असतो. प्रकृती बिघडल्यास आरोग्य सुविधेकरिता १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंडकी येथे जावे लागते. रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण झाले नाही. त्यामुळे पायी व सायकलीने जंगलातून वाट काढताना जीव मुठीत ठेवावा लागतो. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. गावकरी एकाच बोरवेलमधून पाण्याची गरज भागवितात. उन्हाळ्यात भीषण टंचाई निर्माण होते. दोन विहिरी आहेत. पण, यंदा पाऊस कमी पडल्याने या विहिरींनी तळ गाठला.
शासनाने गाव तिथे शाळा उघडल्या. परंतु येथे अजूनपर्यंत अंगणवाडीदेखील सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. किराणा दुकान नसल्याने जीवनाश्यक वस्तु मिळत नाही. तळोधी (बा.) येथे गेल्याशिवाय साधे मीठही विकत घेता येत नाही. लोहार डोंगरी गावापासून गंगासागर हेटी हे गाव तीन किलोमीटर आहे. या रस्त्याची दुरवस्था झाली असून नागरिकांचे हाल होतात.
या मार्गावर रेल्वे प्रशासनाने एक बोगदा तयार केला. त्यातून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे रस्त्यावर साचून राहते. चारही बाजूने जंगल असल्यामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.