लोहारा तलाव खोलीकरण कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:29 AM2021-04-09T04:29:57+5:302021-04-09T04:29:57+5:30
कोरोना काळात कामगारांना दिलासा पळसगाव(पि.) : चिमूर तालुक्यातील लोहारा येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लोहारा ...
कोरोना काळात कामगारांना दिलासा
पळसगाव(पि.) : चिमूर तालुक्यातील लोहारा येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लोहारा येथील गावाजवळ आणि शेती परिसरात लागून असलेल्या तलावाच्या खोलीकरण कामाला सुरुवात झाली. लोहारा येथील सरपंच दीक्षा शैलेंद्र पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करून आज कामाला सुरुवात करण्यात आली. या कामामुळे तलावालगत लागून असलेल्या शेतीच्या पाण्याची पातळीत वाढ होईल. जंगल लागून असल्यामुळे प्राणी, पक्षी यांना फायदा होईल. शिवारात पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी, यासाठी तलावाचे खोलीकरण करण्यात येत आहे. तसेच पाणी हे पूर्ण उन्हाळ्याभर राहिले पाहिजे आणि जंगली प्राण्यांची तहान भागली पाहिजे, हाही उद्देश ठेवून खोलीकरणाचे काम केले जात आहे.
सदर काम हे कोरोनाचे शासकीय नियम पाळून केले जात आहे. यात सर्व मजूर, नागरिक सामाजिक अंतर ठेवून काम करीत आहेत आणि स्वतःची काळजी स्वतः घेत असून रोजगारासाठी काम करीत आहेत. सध्या संपूर्ण जिल्ह्यात मिनी लाॅकडाऊन सुरू असून, सर्व कामकाज ठप्प झाले आहे आणि ग्रामीण क्षेत्रात मजुरांना काम नाही. रिकामे असल्यामुळे या कोरोनाच्या अडचणीच्या काळात कामाला सुरुवात झाल्यामुळे मजुरांना काम मिळाले आहे. गावात ग्रा.पं.च्या कार्यावर आनंदी दिसत आहेत.
सरपंच दीक्षा पाटील यांनी मजुरांशी बोलताना सांगितले की, अशी बहुविध कामे केली जातील आणि गावातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिले जाईल. यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला उपसरपंच गीता जांभुळे, ज्ञानेंद्री घुगुस्कार, हरिभाऊ डुमरे आदींची उपस्थिती होती