Lok Sabha Election 2019; चंद्रपूर लोकसभेसाठी सुमारे ६$४ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:50 AM2019-04-12T00:50:19+5:302019-04-12T00:51:13+5:30

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाने मागील २० दिवसांपासूनच जोरदार जनजागृती केली होती. मात्र उन्हाच्या तडाख्याचा मतदानावर चांगलाच परिणाम झाला.

Lok Sabha Election 2019; About 6% of the vote for Chandrapur Lok Sabha 4 percent | Lok Sabha Election 2019; चंद्रपूर लोकसभेसाठी सुमारे ६$४ टक्के मतदान

Lok Sabha Election 2019; चंद्रपूर लोकसभेसाठी सुमारे ६$४ टक्के मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाने मागील २० दिवसांपासूनच जोरदार जनजागृती केली होती. मात्र उन्हाच्या तडाख्याचा मतदानावर चांगलाच परिणाम झाला. सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ६.१८ टक्के मतदान झाले. त्यानंतर हळूहळू नागरिक घराबाहेर पडू लागले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६४ टक्के (आकडेवारी अंतिम नाही)मतदान झाले.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीसाठी १३ उमेदवार रिंगणात होते. २५ मार्चला सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिल्यानंतर २६ मार्चपासून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. १५ दिवसांच्या प्रचारानंतर आज गुरुवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. मतदानासाठी जिल्ह्यात २१९३ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. यातील ५२ केंद्र क्रिटीकल असल्याने त्याकडे भरारी पथक विशेष लक्ष ठेवून होते. या निवडणुकीकरिता एकूण २६१० कंट्रोल युनिट व २५९६ बॅलेट युनिट निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आले होते. प्रशासनाकडून १०० कर्मचारी राखीव ठेवण्यात आले होते.
आज सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. सध्या संपूर्ण जिल्ह्यातच सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे सकाळच्या टप्प्यात मतदान मोठ्या प्रमाणात होईल, अशी प्रशासनाला व सर्वानाच अपेक्षा होती. शहरातील प्रत्येक केंद्रावर दोन-चार मतदार येऊन मतदान करून जात होते. सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ६.१८ टक्के मतदान झाले. नंतर मात्र पारा ४५ अंशावर असतानाही उन्हाची तमा न बाळगता नागरिक घराबाहेर पडले.
चंद्रपूर शहरात सध्या पाण्याची बोंब सुरू आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. आज नळ येण्याचा दिवस असल्याने बहुतांश नागरिक याच कामात गुंतले होते. त्यामुळे सकाळच्या टप्प्यात मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. सकाळी ९.३० वाजतापासून नागरिक घराबाहेर पडू लागले. त्यानंतर मतदान केंद्रावर हळूहळू गर्दी वाढायला लागली.
सकाळी ११ वाजेपर्यंत लोकसभा मतदार संघात १९.०६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत ३०.५६ टक्के मतदान झाले होते. दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाचा वेग असाच कायम होता.
मतदान केंद्रावर १०-१५ नागरिक येत राहिले. दुपारी ४ वाजेपर्यंत ४६. २७ टक्के मतदान झाले. दुपारी ४ वाजतानंतर मात्र मतदान केंद्रावर गर्दी वाढली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोकसभा क्षेत्रात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर रात्री बºयाच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरूच होती. यामुळे अंदाजे ६४ टक्के मतदान होईल, अशी शक्यता वर्तविली गेली.

यादीत नाव नसल्याने गोंधळ
यावेळी जिल्हा प्रशासनाकडून घरोघरी देण्यात येणारी मतदान केंद्राची स्लिप अनेकांना देण्यात आली नाही. त्यामुळे आपले नाव कोणत्या केंद्रात आहे, हेच अनेकांना माहित नव्हते. त्यामुळे नागरिकांनी जवळच्या मतदान केंद्रात जाऊन आपले नाव तपासले. मात्र केंद्रावरील मतदान यादीतही अनेकांची नावे नसल्याने गोंधळ उडाला होता. हा प्रकार चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर घडला. यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले.

या उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत १३ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपचे हंसराज अहीर, कॉग्रेसचे सुरेश धानोरकर, बहुजन समाज पार्टीचे सुशील वासनिक, बहुजन मुक्ती पार्टीचे डॉ.गौतम गणपत नगराळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे दशरथ पांडुरंग मडावी, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नामदेव माणिकराव शेडमाके, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे नितेश आनंदराव डोंगरे, प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाचे मधुकर विठ्ठल निस्ताने, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. राजेंद्र श्रीरामजी महाडोळे, अपक्ष उमेदवार अरविंद नानाजी राऊत, नामदेव केशव किनाके, मिलिंद प्रल्हाद दहिवले, राजेंद्र कृष्णराव हजारे यांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांचे भाग्य गुरुवारी मशीनबंद झाले आहे. त्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला २३ मे रोजी होणार आहे.

रात्री १० वाजेपर्यंत मतदान
चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील बुथ क्रमांक १० मध्ये ईव्हीएम मशीन अतिशय संथपणे चालत होती. त्यामुळे एक मतदान करायला बराच वेळ लागत होता. सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. अजूनही १५० मतदार रांगेत होते. त्यामुळे या मतदान केंद्रावर रात्री ९ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरूच राहणार, असे सांगितले जात आहे. याशिवाय सावली तालुक्यातील घोडेवाही येथेही असाच प्रकार घडला. सायंकाळी ६.४५ वाजतानंतरही या केंद्रावर गर्दी कायम होती. बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील केंद्र क्रमांक १५८ व १५९ मध्ये सायंकाळी एकच गर्दी उसळली. मात्र मशीन संथगतीने सुरू असल्याने येथेही रात्री १० वाजेपर्यंत मतदान सुरू राहिले. सोबतच ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव येथेही वेळ संपल्यानंतरही मतदान प्रक्रिया सुरू होती.

दारूड्याला दिला चोप
चंद्रपुरातील बाबुपेठ येथील मतदान केंद्रात नागरिक रांगेत उभे असताना अचानक एक मद्यपी तिथे बरळत आला. रांग तोडून थेट मतदान केंद्रात शिरला. केंद्र अधिकाऱ्यांना अकारण त्याने शिवीगाळ केली. त्यानंतर मद्यधुंद या माणसाला स्वत:चाच तोल सांभाळता न आल्याने केंद्रातच कोसळला. त्यानंतर पुन्हा त्याने पोलिसांना शिवीगाळ केली. दरम्यान, बंदोबस्तात असलेल्या महिला पोलिसांनी त्याला बाहेर काढून चांगलाच चोप दिला.

आधी मतदान; मग लग्न
नागभीड तालुक्यातील मेंडकी येथील कालीदास मारभते या युवकाचे आज गुरुवारीच गिरगाव येथील वधुमंडपी लग्न होते. मात्र मतदानाचा दिवस असल्याने नवरदेव कालिदास मारभते यांनी आधी मेंडकी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा अधिकार बजावला. त्यानंतर तो वºहाड्यासह गिरगाव येथे वरात घेऊन रवाना झाला. दुसरा असाच प्रकार तळोधी (बा.) जवळच्या येनोली येथे घडला. येथे चंद्रशेखर गायकवाड याचेही लग्न होते. त्याने लग्न आटोपल्यानंतर नवरदेवाच्या वेशातच मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. सिंदेवाही तालुक्यातील डोंगरगाव येथील नवरदेव दिनेश टीकाराम मस्के याचे सावरगावला लग्न होते. मात्र आधी लग्न लोकशाहीचे म्हणत त्याने प्रथम मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर त्याची वरात घेऊन सावरगावला वधूमंडपी रवाना झाला.

मशीनमध्ये तांत्रिक बिघाड
मूल तालुक्यातील मौजा बोंडाळा (खुर्द) येथील बुथ क्रमांक ३१७ व भेजगाव येथील बुथ क्रमांक २६५ वर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान उशिराने सुरू झाले. पाटण येथील बुथ क्रमांक ७०/२८१ येथेही मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने दीड तास विलंबाने मतदान प्रक्रिया सुरू झाली. याशिवाय चिमूर तालुक्यातील खडसंगीमध्येही असाच प्रकार घडला. माजरी कॉलरी येथील ब्लॅक डायमंड शाळेतील बुथ क्रमांक २३८ मध्ये सकाळी ११ वाजता मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आला. याची सूचना मिळताच माजरी क्षेत्र निवडणूक अधिकारी यांनी घटनास्थळी पोहोचून मशीनची पाहणी केली. ताबडतोब ती मशीन बदलवून नवीन मशीन लावण्यात आली. पहिली मशीन सील करण्यात आली. दोन्ही मशीनमधील मतमोजणी होणार असल्याचे केंद्र अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Lok Sabha Election 2019; About 6% of the vote for Chandrapur Lok Sabha 4 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.