Lok Sabha Election 2019; चंद्रपूर जिल्ह्यातील चिखलगाव-लाडजवासीयांचा मतदानावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 06:53 PM2019-04-11T18:53:08+5:302019-04-11T18:55:22+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव व लाडज या दोन्ही गावांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या दोन्ही गावांनी आज गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव व लाडज या दोन्ही गावांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या दोन्ही गावांनी आज गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला. या गावांमधील तब्बल अडीच हजार मतदारांनी मतदान केले नाही. त्यामुळे या गावातील मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता.
चिखलगाव या लाडज ही दोन्ही गावे वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. या दोन्ही गावाच्या दरम्यान वैनगंगाचे मोठे पात्र आहे. नदी पात्रावर पूल बांधण्याची मागणी या गावांनी अनेक वर्षांपासून केली आहे. मात्र याकडे शासनाने व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असल्याने ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवरच बहिष्कार टाकला. उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विद्यासागर चव्हाण व पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी गावकऱ्यांनी मतदान करावे, यासाठी वारंवार प्रयत्न केला. बैठकी घेतल्या. परंतु लोकप्रतिनिधीनी मात्र पूर्णत: दुर्लक्ष केल्याने गावकऱ्यांनी अखेर बहिष्काराचा पवित्रा कायम ठेवला. चिखलगाव केंद्र क्र. ४७, ४८ या केंद्रावर ८४०, ६२९ मतदान असून लाड क्र. ४६ या केंद्रावर ९६३ एवढे मतदान आहे. मात्र एकाही मतदाराने मतदान केले नाही. मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांची मने वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. गावकरी मतदान न करता आपल्या दैनंदिन कामाला निघून गेले.
चिखलगाव येथील लोकांना समजावून सागितले. परंतु त्यांनी आमच्याकडे लक्ष दिले नाही. आपला बहिष्कार कायम ठेवला व आपल्या कामाला निघून गले.
-प्रा. उमेश इंदूरकर
केंद्राध्यक्ष चिखलगाव केंद्र क्र. ४७
लाडज या गावाला गेल्या २६ वर्षांपासून जाणे येणे करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. पूल-कम बंधारा बांधण्यासाठी आम्ही सातत्याने मागणी करीत आहोत. परंतु या मागणीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
-भोजराज दुर्योधन नंदागवळी
उपसरपंच, लाडज