Lok Sabha Election 2019; पहिल्यांदाच महाराष्ट्राची मोठी अधोगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 09:18 PM2019-04-05T21:18:17+5:302019-04-05T21:20:33+5:30
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. देशात ५० हजार तर महाराष्ट्रात १५ हजारांवर शेतकऱ्यांच्या आत्महच्या झाल्या. महाराष्ट्राची एवढी अधोगती यापूर्वी कधीही झाली नाही, असा घाणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथील जाहीर सभेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भाजपच्या पाच वर्षांच्या काळात बेरोजगारी वाढली. १५ लाखांचे आश्वासनही पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. देशात ५० हजार तर महाराष्ट्रात १५ हजारांवर शेतकऱ्यांच्या आत्महच्या झाल्या. महाराष्ट्राची एवढी अधोगती यापूर्वी कधीही झाली नाही, असा घाणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथील जाहीर सभेत केला. तीन राज्यात भाजपला जनतेनी पायउतार केले. आता वेळ महाराष्ट्राची आहे. राहुलजींना पंतप्रधान पहायचे आहे. काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा विजयी करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर व गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या प्रचारार्थ येथील चांदा क्लब ग्राऊंडवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा दुपारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. मंचावर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, उमेदवार सुरेश धानोरकर, गडचिरोली मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार, राकाँचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, डॉ. रजनी हजारे व अन्य काँग्रेस-राकाँ पदाधिकारी उपस्थित होते. या सभेसाठी तळपत्या उन्हात चंद्रपूर व गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या उपस्थितीने सभास्थळ खचाखच भरले होते.
दुपारी ३.३० वाजता राहुल गांधी यांचे सभास्थळी आगमण झाले. यावेळी त्यांनी हात उंचावून जनतेला अभिवादन करताच उपस्थितांनी राहुल गांधी ‘आगे बढो’च्या घोषणा दिल्या. चव्हाण पुढे म्हणाले, भाजपच्या काळात महिलांवर अत्याचार वाढले आहे. त्यांनी बेटी बचाओ, बेटी पढोओचा नारा दिला. मात्र ‘भाजपवालो से बेटी बचाओ’ म्हणण्याची वेळ आली आहे, अशी गंभीर टीकाही त्यांनी केली.
राज्यातीलच नव्हे, तर देशातील शेतकऱ्यांची दैना झाली आहे. शेतमालाचे भाव कमी झाले. हमीभाव मिळत नाही. शेतकरी अडचणीत आले आहेत. बेरोजगारांचा रोजगार हिरावला गेला. देशातील कायदा व सुवव्यवस्था अडचणीत आली आहे. देश अधोगतीकडे जात आहे. ज्यांच्या हातात देशाची सूत्रे दिली तो चौकीदार म्हणताच अशोक चव्हणांचे वाक्य जनेतेने ‘चोर निघाला’ म्हणत पूर्ण केले. त्या चौकीदाराने देशाची संपत्ती लुटून नेल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला.
चहावाल्याने देश तर दूधवाल्याने चंद्रपूर जिल्हा बरबाद केला - वडेट्टीवार
चहावाल्याने देश बरबाद केला आणि दूधवाल्याने चंद्रपूर जिल्हा बरबाद केला, हा दूधवाला १५ वर्षे खासदार म्हणून निष्क्रिय ठरला, अशी टीका काँग्रेसचे विधानसभेचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. खासदाराने कोणतेही काम केले नाही. आता तो मंत्री आहे. नवीन उद्योग जिल्ह्यात आले नाही. बेरोजगारांचा एकही प्रश्न सुटला नाही. रेल्वेचे दोन थांबे दिले. देशाला वाचवायचे असेल, लोकशाही टिकवायची असेल आणि हुकुमशाही संपवायची असेल, तर काँग्रेसशिवाय गत्यंतर नाही, असा हल्लाबोलही आ. वडेट्टीवार यांनी केला. दारूवाला की दूधवाला पाहिजे, असे म्हणतात. बाळू धानोरकरांकडे २० वर्षांपासून परवाना आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. मग दारूबंदी झाली का, असा सवाल करीत आता ५० रुपयांची दारू २०० रुपयांना मिळते, असाही आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
राहुल गांधी दिल्या गुडी पाडव्याच्या शुभेच्छा
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाला सुरूवात करताच मराठी सण गुडी पाडव्याच्या उपस्थित जनसमुदायाला शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.