Lok Sabha Election 2019; तीनही प्रमुख उमेदवारांच्या गोटात विजयाचे गणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:53 AM2019-04-12T00:53:15+5:302019-04-12T00:54:24+5:30
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. रात्री उशिरापर्यंत काही मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या असल्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी हाती आलेली नव्हती. मतदान करून आल्यानंतर मतदार निकालाच्या चर्चांमध्ये रंगले होते.
राजेश भोजेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. रात्री उशिरापर्यंत काही मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या असल्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी हाती आलेली नव्हती. मतदान करून आल्यानंतर मतदार निकालाच्या चर्चांमध्ये रंगले होते. कुठे भाजप, कुठे काँग्रेसच जिंकेल असा सूर होता. तर काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीही गठ्ठा मते घेण्याची चर्चा होती. मात्र कुणीही एकावर ठाम दिसत नव्हते. कोणताही पक्ष जिंकला तरी मताधिक्य मात्र कमी असल्याचेही बोलले जात होते. यावरून ही निवडणूक काट्याची झाल्याचा अंदाज येत होता.
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासूनच मतांची गणिते मांडणे सुरू होते. काँग्रेसने तगडा उमेदवार मैदानात उतरविल्यास भाजपसमोर कडवे आव्हान उभे करता येणे शक्य आहे, असा सूर होता. तर काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून दररोज नवे नाव समोर येत होते.
यामुळे काँग्रेसश्रेष्ठी उमेदवाराबाबत ठाम नसल्यामुळे मतदार संभ्रमात पडले होते. चर्चेत नसताना अचानक विशाल मुत्तेमवार यांचे नाव पुढे आले. या नावारून जिल्ह्यातील गटबाजी उफाळून आली. आशिष देशमुख, विनायक बांगडे यांची नावे चर्चेत होतीच. मुत्तेमवार यांचे नाव मागे पडून अचानक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून विनायक बांगडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. बांगडे यांच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र ते अल्पकाळाचे ठरले. विशाल मु्त्तेमवारांसारखाच बांगडे यांच्या नावालाही कडवा विरोध झाला. अखेर सुरूवातीपासून काँग्रेसच्या तिकीटावर डोळा ठेवून असलेले सुरेश धानोरकर यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब करीत बांगडे यांचे नाव यादीतून वगळले. यामुळे बांगडे यांच्याशी जुळलेला एक मोठा गट नाराजीचा सूर काढत राहिला. अखेरच्या क्षणापर्यंत ही नाराजी कायम होती. प्रचारातही एक गट कायम अंतर ठेवून होता.
दुसरीकडे भाजप पूर्ण ताकदीनिशी प्राचारात उतरली होती. दुसरीकडे राज्याचे अर्थ व नियोजन, वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे हंसराज अहीर यांच्या बाजूने खिंड लढवत होते. यासोबतच भाजपने काही स्टार नेत्यांच्याही मतदार संघात सभा घेतल्या. काँग्रेसने राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशिवाय दुसऱ्या मोठ्या नेत्याची सभा या मतदार संघात घेतल्याचे दिसले नाही. काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे हे उमेदवार सुरेश धानोरकर यांच्यासाठी जंगजंग पछाडत होते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. राजेंद्र महाडोळे यांनी सुरूवातीला धिम्म्या गतीने प्रचार सुरू केला खरा, परंतु प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी चांगलीच मुसंडी मारल्याचे दिसून आले. त्यांचा कॅडर तन-मन-धनाने प्रचारात गुंतला होता. बारा दिवसातील प्रचाराच्या काळात हे तीनच उमेदवार या ना त्या कारणाने चर्चेत होते.
अन्य उमेदवार प्रचारात आणि जनतेच्या चर्चेतही दिसले नाही. ही निवडणूक या तीनच उमेदवारांसभोवताल फिरत होती. ग्रामीण व शहरी भागाचा अंदाज घेतला असता ग्रामीण भागात काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर असल्याचे बोलले जात होते. शहरी भागातही हेच चित्र होते. वंचित बहुजन आघाडीही चमत्कारीत मते घेतील, असा सूर काही ठिकाणी ऐकायला मिळाला.
वंचित बहुजन आघाडीने जितकी जास्त मते घेतली त्याचा थेट फायदा भाजपला होईल, असेही चर्चेतून पुढे येत होते. तीनही उमेदवारांच्या गोटात डोकावून बघितले असता प्रत्येकच पक्ष विजयाचा दावा करीत आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने मतांची गोळा-बेरीज करून विजयाचे गणित पटवून देत आहेत.
मात्र एकूणच दिवसभराच्या माहोलवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये मतांची कडवी झुंज होणार असल्याचे चित्र आहे. पैकी एकाचा कमी फरकाने का होईना विजय होईल, असे चित्र आहे. निकालासाठी आणखी बराच काळ वाट पहावी लागणार असल्यामुळे ही गणिते दिवसागणिक बदलणार हे मात्र नक्की. कोणाचे गणित बरोबर आणि कोणाचे चुकले हे निकालाअंती कळणार आहे.