Lok Sabha Election 2019; सभा, रॅली आणि शक्तिप्रदर्शनाने गाजला दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:28 PM2019-04-09T23:28:57+5:302019-04-09T23:31:03+5:30

येत्या ११ एप्रिलला होऊ घातलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गेल्या बारा दिवसांपासून सुरू झालेल्या प्रचाराला सर्वच उमेदवारांनी मंगळवारी विराम दिला.

Lok Sabha Election 2019; Meetings, Rally and Power Showcase Day | Lok Sabha Election 2019; सभा, रॅली आणि शक्तिप्रदर्शनाने गाजला दिवस

Lok Sabha Election 2019; सभा, रॅली आणि शक्तिप्रदर्शनाने गाजला दिवस

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : १९ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येत्या ११ एप्रिलला होऊ घातलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गेल्या बारा दिवसांपासून सुरू झालेल्या प्रचाराला सर्वच उमेदवारांनी मंगळवारी विराम दिला. भाजपने बल्लारपूर व चंद्रपूर येथे अनुक्रमे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेतली तर काँग्रेसने चंद्रपूरातून दुचाकी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले, तसेच मूलमध्ये मराठी अभिनेत्री आसावरी जोशी यांची सभा घेऊन प्रचाराला विराम दिला. वंचित बहुजन आघाडीला ऐनवेळी दुचाकी रॅलीसाठी परवानगी न मिळाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघ क्षेत्रफळाने मोठा आहे. या मतदार संघात तब्बल १८०० गावे समाविष्ट आहेत. या गावांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची चांगलीच दमछाक झाल्याने प्रचारादरम्यान बघायला मिळाले. भाजप उमेदवार हंसराज अहीर हे सुरूवातीपासूनच या गावांचा दौरा करीत होते. काँग्रेस उमेदवार सुरेश धानोरकर यांना ऐनवेळी काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याने त्यांची चांगलीच अडचण झाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांनी कार्यकर्त्यांना वर्गणी काढून गावांपर्यंत पोहेचण्याचा प्रयत्न केला. अन्य १० उमेदवारांपैकी काही उमेदवारच प्रचार करताना दिसून आले. एकीकडे मतदार संघ पिंजून काढणे आणि दुसरीकडे उन्हाची काहीली यामुळे निवडणुकीचे वतावरण दुहेरी तापले होते. भाजपने स्टार प्रचारकांच्या सभांमधून विकास कामांच्या आधारावर मते मागितली. तर काँग्रेसने मतदार संघ विकासात माघारला म्हणून लोकसेवेचे संधी द्या म्हणत मते मागितली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा घेऊन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. हे दोन्ही पक्ष एकाच माळेचे मनी आहेत. दोन्ही उमेदवारांपेक्षा सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्या म्हणत वंचित बहुजन आघाडीने मते मागितली. या तिनही प्रमुख उमेदवारांपैकी मतदारांवर प्रभाव पाडण्यात कोणत्या पक्षाचा उमेदवार यशस्वी ठरला, याचा फैसला मतदारराजा ११ एप्रिलला मतदानाच्या माध्यमातून करणार आहेत. प्रचारतोफा शांत होताच या तीन प्रमुख उमेदवारांकडून मूक प्रचाराला गती देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोण बाजी मारतो याकडे मतदारांचे लक्ष लागले आहेत.
१५ हजार कर्मचारी आज केंद्रांवर रवाना
चंद्र्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी १५ हजार कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी झाले. मतदार संघात १९ लाख ४ हजार ३२ सर्वसाधारण मतदार आहेत. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या ९ लाख ८४ हजार ३८१, महिला मतदारांची संख्या ९ लाख १९ हजार ६२८ व तृतीयपंथी २० आहेत. दिव्यांग मतदार ६ हजार २६९ यामध्ये अंध मतदारांची संख्या ८९६ आहे. ५२ संवेदनशील मतदान केंद्रात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदान करण्यासाठी २ हजार २९३ मतदान केंद्रे आहेत. केंद्र्रनिहाय इव्हीएम मशीन बसविण्यात येणार आहे. अतिरिक्त राखीव इव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. इव्हीएम मशीनसोबत कंट्रोल युनिट २ हजार ५६९, बॅलेट युनिट २ हजार ५७६ आणि व्हीव्हीपॅट २ हजार ५५४ असे ३ युनिट प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार आहे.

रॅलीला परवानगी नाकारल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील प्रमुख तीन उमेदवारांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांचा समावेश होते. अन्य राजकीय पक्षांनी सभा व रॅलींच्या माध्यमातून प्रचाराला विराम दिला. वंचित बहुजन आघाडीनेही अखेरच्या टप्प्यात प्रचारात मोठी आघाडी घेतली. यासाठी कार्यकर्त्यांनी स्वत: वर्गणी गोळा केली होती. प्रचाराचा समारोप धडाकेबाज व्हावा म्हणून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हजारांवर कार्यकर्ते तयारीनिशी सज्ज झाले होते. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे कारण पुढे करून जिल्हा प्रशासनाने रॅलीला परवानगी नाकारली. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. अखेर ‘डोअर टु डोअर’ प्रचार करून ही बाब मतदारांना पटवून देत प्रचाराचा समारोप केला. यामध्ये नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्यावतीने देण्यात आली.

कलम १४४ लागू
मंगळवारी सायंकाळी ६ वाजता प्रचार संपल्यानंतर फौजदार प्रक्रिया संहितेनुसार ९ ते १२ एप्रिलपर्यंत १४४ कलम लागू केले. या काळात सार्वजनिक सभा व पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध घालण्यात आले.

उन्हापासून मिळणार सुरक्षा
मतदान केंद्रावर पुरेशा सावलीत मतदान करता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय पिण्याचे पाणी, निवडणूक साहित्यापासून तर मतदान केंद्रावरील रॅम्प, विद्युत व्यवस्था, शेड, मेडीकल किट, व्हीलचेअर आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे.

४ हजार १ ४२ पोलीस तैनात राहणार
चंद्रपूर जिल्ह्यात २ हजार १३१ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्यामध्ये १२ मतदान केंद्र महिलांकरिता तयार करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ४ हजार १४२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर तैनात करण्यात आली. यामध्ये १ हजार ५०० पोलीस अधिकारी, ३ हजार ४०० पोलीस कर्मचारी, १ सीआयएसएफ कंपनी, ३ एसआरपीएफ कंपनी, ७८९ होमगार्ड, सी - ६० व दंगानियंत्रणचे २ पथक, १ बॉम्ब शोध पथक यांच्यासह पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर व मुंबई येथील ६९९ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. वाहतुक नियंत्रण शाखेतील १५, पोलीस मोटार परिवहन विभागातील १६९ कर्मचारी आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Meetings, Rally and Power Showcase Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.