Lok Sabha Election 2019; दारूबंदीसाठी प्राणांतिक लढा दिला म्हणून विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 08:52 PM2019-04-05T20:52:05+5:302019-04-05T20:55:01+5:30
भाजप असो की काँग्रेस या प्रश्नासाठी २००१ पासून मी जाहीर विरोधी भूमिका घेत असून यावर मी ठाम आहे. कुणी कोणताही अपप्रचार करोत मला पर्वा नाही, असा दावा श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केला.
राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी झाली. मात्र राज्य सरकारने अद्याप कायदा केला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून २०१९ च्या अधिवेशनात कडक कायदा करू, असे लेखी आश्वासन मला दिले आहे. हे आश्वासन पाळले नाही तर भाजपविरुद्धही उपोषणाचे हत्यार उपसणार आहे. दारूबंदीसाठी मी प्राणांतिक लढा दिला. परिणामी, भाजपच्या काळातच बंदी झाली. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दारूविक्रेत्या उमेदवारालाच उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप असो की काँग्रेस या प्रश्नासाठी २००१ पासून मी जाहीर विरोधी भूमिका घेत असून यावर मी ठाम आहे. कुणी कोणताही अपप्रचार करोत मला पर्वा नाही, असा दावा श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केला. लोकसभा निवडणूक प्रचाराचा आखाडा रंगत असताना अॅड. गोस्वामी यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराला उघड विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या.
काँग्रेसच्या उमेदवाराला विरोध करून आपण थेट भाजपला पाठींबा देत आहात?
हा आरोप खोटा आहे. यासाठी मी थोडे मागे जाते. जिल्ह्यात दारूबंदी व्हावी, याकरिता २००१ पासून श्रमिक एल्गार सातत्याने लढा देत आहे. यावर्षी मूल पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे दारूबंदी झालीच पाहिजे, यासाठी मिळेल त्या पक्षांचा पाठींबा घेऊन व्यापक लढ्याची पार्श्वभूमी तयार केली. शेकडो मोर्चे काढले. त्यामुळे माझ्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. जीवघेण्या धमक्यांना सामोरे जावे लागले. हा सर्व प्रकार काँग्रेसच्या कालखंडातच झाला. दरम्यान, भाजप सरकारने सकारात्मक पाऊल उचलले. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यात दारूबंदी झाली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपच्या अन्यायकारक धोरणांविरूद्ध मी आंदोलने करीत आहे. जनतेवर अन्याय झाल्यास मी गप्प बसणार नाही. काँग्रेस पक्षाची विचारधारा व दारूबंदीसंदर्भात त्या पक्षाची भूमिका जाहीर असताना दारू विक्री करणाऱ्या नेत्याला लोकसभेची उमेदवारी का देण्यात आली, हा माझा प्रश्न आहे. मी स्वत: चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची मतदार आहे. मतदार म्हणून अशा उमेदवारांना कोणत्या नैतिकच्या आधारावर समर्थन द्यायचे? त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता म्हणून हा प्रश्न उघडपणे का मांडू नये. दारूबंदीविरूद्धचा माझा हा विरोध निवडणुकीपुरता नाही. सरकार कुणाचीही येवो. चंद्रपूर मतदार संघात दारूबंदीला समर्थन करणाऱ्यांचा जाहीर विरोध करत राहू. .
भाजपने ऐन निवडणुकीच्या तोेंडावर मद्य उत्पादकाला लोकसभेची उमेदवारी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील सुजय विखे पाटील हे भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. त्या जिल्ह्यातील महिलांनी दारूबंदीसाठी मला बोलाविले तर तिथे जाऊन भाजपच्या विखे पाटलाविरोधात प्रचार करायला आजही तयार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची मी मतदार आहे. त्यामुळे या क्षेत्रापुरताच मी हा निर्णय घेतला आहे. वर्धा, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यातही श्रमिक एल्गारचे संघटन आहे. तेथील कार्यकर्ते आपल्या विवेकानुसार निर्णय घेतील.
दारूबंदीचा कायदा करण्यास भाजप सरकार का घाबरते ?
- राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. मात्र गुन्हेगारांना शिक्षा मिळावी, या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा करता यावी, याकरिता सरकार कायदा करण्यास घाबरत आहे. भाजप सरकार यात अपयशी ठरले. या मुद्यावरून राज्यातील भाजप सरकारविरूद्ध अनेक सभा बैठकांमधून मी विरोध करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून २०१९ च्या अधिवेशनात दारूबंदीचा कडक कायदा करू, असे लेखी आश्वासन मला दिले. सरकारने हे आश्वासन पाळले नाही तर आंदोलन करण्यापासून मला कुणीही अडवणार नाही. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार धानोरकर यांना विरोध करण्यामागे माझा व्यक्तिगत कुठलाही हेतू नाही. दारूबंदीसाठी आम्ही शेकडो लढे उभारले. त्यामुळे दारूविक्री करणाºया काँग्रेसच्या उमेदवाराचे आम्ही कदापि समर्थन करणार नाही.
भाजप सरकारने वनहक्क कायद्यातील त्रुटींकडे दुर्लक्ष केले?
यासाठीच मी मागील चार वर्षांत शेकडो आंदोलने व मोर्चे काढले. खरे तर कायदा काँग्रेसने तयार केला. गैरआदिवासींसाठी तीन पिढ्यांची अट लावून देशातील लाखो वननिवासी जनतेवर अन्याय करण्यात आला आहे. केंद्रात भाजपचे बहुमताचे सरकार असूनही कायद्यातील त्रुटी दूर झाल्या नाहीत. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्याच्या प्रक्रियेत राज्य पातळीवरील बैठकीत मला बोलाविले होते. त्या बैठकीत मी अनेक सुचना केल्या. आदिवासींसोबतच देशातील लाखो वननिवासी गैरआदिवासींच्या हितासाठी वन कायद्यातील त्रुटी दूर करण्याचा विषय निवडणूक जाहीरनाम्यात मी प्रामुख्याने मांडला होता. मात्र, हा विषय जाहीरनाम्यात आला नाही असो... काँग्रेसमध्ये अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत.
राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या, या शब्दात विरोधक तुमच्यावर टीका करतात
हे खरे आहे. लोकशाही व्यवस्थेत राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवणे काही गैर नाही. मतदार आणि उमेदवार म्हणून निवडणुकांना सामोरे जाण्यात गैर काय आहे? लोकशाहीवर माझा विश्वास आहे. या मार्गानेच अनेक लढे देऊन वंचित समाज घटकांना न्याय मिळवून दिला. केवळ आंदोलन नाही तर विधायक कृतिशील उपक्रमांवरही माझा भर आहे.