Lok Sabha Election 2019; विकास कामे केलेल्या उमेदवाराला मतदान करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 08:41 PM2019-04-05T20:41:54+5:302019-04-05T20:43:32+5:30
मतदारांनी विकासकामे केलेल्या उमेदवाराला मोठया संख्येने मतदान करण्याचे आवाहन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे पालवे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: गेल्या ६० वर्षात कॉंग्रेसने सत्ता भोगून केवळ गरीब वाढविण्याचे काम केलेले आहे. परंतु केंद्रातील मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षात उज्ज्वला योजना, आयुष्यमान योजनेसह विविध योजना अमलात आणून गरिबी हटवा मोहिमेला प्रारंभ केला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी विविध योजना पुर्णत्वास नेण्यासाठी केंद्रातून निधी खेचून आणला व विकासाची गंगा याठिकाणी पोहचविली आहे, कोणाची जात पाहून विकास कामे केलेली नाही. यामुळे मतदारांनी विकासकामे केलेल्या उमेदवाराला मोठया संख्येने मतदान करण्याचे आवाहन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे पालवे यांनी केले. त्या भाजपा-शिवसेना-रिपाई (आ.) महायुतीचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या मूल येथील बाजार चैकातील प्रचार सभेत बोलत होत्या.
कार्यक्रमाला भाजप उमेदवार हंसराज अहीर, राज्याचे अर्थ नियोजन वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगडे, भाजपच्या तालुकाध्यक्ष संध्या गुरनुले, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदु रणदिवे, बांधकाम सभापती महेंद्र करकाडे, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, मूल पंचायत समितीचे उपसभापती चंदु मारगोनवार आदी उपस्थित होते.
ना. मुंडे पुढे म्हणाल्या, चंद्रपूर जिल्हा वाघासाठी प्रसिध्द आहे, या जिल्ह्यात येवून मला भाजप नेत्यानी वाघिणीची उपमा दिली, त्या जिल्हयात हंसराज अहीर, सुधीर मुनंगटीवार यांनी विकासाची गंगा गावोगावी पोहचविली. त्या जिल्हयात आता कोल्हयाचे दिवस येणार नाही, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येकांना घराचे स्वप्न पुर्ण होणार आहे, येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत बेघरमुक्त करण्याचा आमचा संकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगीतल्या.
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दुग्धविकासाला मान्यता दिलेली असल्याचे सांगून निराधार योजनेचे अनुदान वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले, आता कॉंग्रेसची एक्सपायरी डेट जवळ आली असून महात्मा गांधीचे असलेले स्वप्न पुर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. संचालन प्रवीण मोहुर्ले यांनी केले. सभेला बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.