Lok Sabha Election 2019; असे चालते ईव्हीएमचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:51 AM2019-03-26T11:51:32+5:302019-03-26T11:54:07+5:30
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही व्यवस्थेचा देश आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन) ची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही व्यवस्थेचा देश आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन) ची आहे. परंतु, याबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम व कुतूहलाचे वातावरण आहे. त्यामुळे मशीनचे स्वरूप समजून घेणे गरजेचे आहे.
-ईव्हीएममध्ये सर्वाधिक किती मते नोंदली जाऊ शकतात?
ईव्हीएममध्ये कमाल ३,८४० मते नोंदली जाऊ शकतात. एका मतदान केंद्रावर १५०० हून कमी मतदारांची संख्या असते.
- वीज पुरवठा नसलेल्या भागात ईव्हीएम कसे वापरले जाते?
ईव्हीएम विद्युत पुरवठ्यावर अवलंबून नसते. ते अल्कलाईन बॅटरीवर चालते.
- ईव्हीएममध्ये किती उमेदवार सामावू शकतात?
उमेदवारांची संख्या ६४ पर्यंत असल्यास ईव्हीएमद्वारे निवडणुका घेता येतात.
- उमेदवारांची संख्या ६४ हून अधिक झाल्यास काय होते?
अशा प्रकरणात पारंपरिक मतपत्रिका व मतपेट्यांच्या पद्धतीनुसार निवडणुका घेतल्या जातात.
- मतपत्रिकांऐवजी ईव्हीएम आणण्याची गरज का पडली?
मतमोजणी करण्यासाठी लागणारा प्रदीर्घ काळ तसेच कधीकधी दोन दिग्गज उमेदवारांच्या मतांमध्ये कमी फरक आढळल्यास फेर मतमोजणी करण्याच्या मागणीमुळे ही परिस्थिती आणखी कठीण होत असे. देशात ईव्हीएमची निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड व इलेक्ट्रॉनिक्स कॉपोरेशन आॅफ इंडिया लिमिटेडकडून केली जाते.
- भारताव्यतिरिक्त ईव्हीएम कोणत्या देशात वापरले जाते?
नेपाळ व भूतानमध्ये ईव्हीएम वापरले जाते.
-देशात ईव्हीएम प्रथम कुठे वापरली गेली?
१९८२ रोजी केरळ राज्यातील परुर विधानसभा मतदारसंघात ५० जागांवर यंत्र वापरले.
- ईव्हीएमचे फायदे कोणते?
अवैध व शंकास्पद मते टाळता येतात. मतमोजणी जलद होते. एकच मतपत्रिका आवश्यक असल्यामुळे छपाई खर्चात बचत होते.
- ईव्हीएम सीलबंद करण्याची काय पद्धत आहे? असे का केले जाते? हे कसे केले जाते?
ईव्हीएमल संपूर्णपणे वेष्टनात गुंडाळले जाते. जेणेकरून त्याच्या बटणांना कुणालाही हात लावता येणार नाही. त्यावरील रिझल्ट सेक्शनलाही सीलबंद केले जाते. मतमोजणीआधी कुणालाही निकाल कळत नाही. सीलवर मतदान अधिकाऱ्यांच्या सीलबरोबरच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची सही घेतले जाते.
- मतदानानंतर मतमोजणीपर्यंत ईव्हीएम कुठे ठेवली जातात?
मतदानानंतर सुरक्षित ठिकाणी मतदान यंत्र ठेवली जातात. जवळपासच्या ठिकाणी जिथे उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत देखरेख ठेऊ शकतो. बहुतेकदा ही यंत्र मतमोजणीच्याच ठिकाणी ठेवली जातात.