चंद्रपुरात देश आणि ‘देशी’वरून जुंपली; लोकसभेची निवडणूक गाजणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 09:16 AM2024-04-16T09:16:44+5:302024-04-16T09:17:47+5:30
दारू म्हटले की चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे चित्र डोळ्यापुढे उभे राहिल्यावाचून राहात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : दारू म्हटले की चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे चित्र डोळ्यापुढे उभे राहिल्यावाचून राहात नाही. यावेळीही चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ‘दारू’ ने लक्ष वेधले आहे. प्रचारात भाजपकडून आम्ही देशासाठी लढतो ‘देशी’ साठी लढत नाही, असा आरोप करण्यात आला. तर काँग्रेसकडून या दारूच्या दुकानांना राज्य सरकारचा परवाना आहे. तुम्ही सत्तेवर आल्यास ही दुकाने बंद करण्याची घोषणा करा, असे आव्हानही दिले.
अशातच भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रचार करताना ‘दारू’ चा मुद्दा छेडला. त्यांनी सभेत प्रश्न विचारला, धानोरकरताईचा व्यवसाय काय, दारू विक्रीचा व्यवसाय आहे की नाही?, दारू विकणारी बाई.. तुमचे पती नाही याचे दु:ख बाई म्हणून आम्हालाही आहे. पण तुमच्या दारूपायी हजारो महिलांचे पती गेले त्यांचे दु:ख तुम्हाला दिसत नाही का?....आता या भाषणावरून समाजमाध्यमात साेशल वाॅर सुरू झाले आहे. त्यांनी त्यांच्या भाषणाचे ट्वीट करून दारूचा व्यवसाय असलेल्या धानोरकरांनी हजारो कुटुंबाचे वाटोळे केले..? असा सवालही उपस्थित केला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाविकास आघाडीने प्रत्युत्तरात एक पोस्ट व्हायरल केली ती देखील व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये, भाजपची भाषा दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
हे सर्वांना माहिती आहे. चित्रा वाघ यांना उद्देशून, दारूचे कारखाने केवळ काँग्रेसवाल्यांचेच आहे का ? भाजपवाल्यांचे नाही का? असे सांगत नेत्यांची नावेच दिली व जनतेला सगळं कळतंय, अशा प्रकारे प्रत्युत्तर दिले आहे. यावरून चंद्रपूर लोकसभा मतदार संघाला पुन्हा ‘दारू’चा गंध लागल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दोन्ही पोस्टवरून लक्षात येते.