जिल्हाभर पेरणीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 10:28 PM2019-07-01T22:28:48+5:302019-07-01T22:29:09+5:30
गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये वाढ झाली आहे. शेतजमिनी ओल्या झाल्यामुळे खोळंबलेल्या पेरणीच्या कामांनाही वेग आला आहे. शेतकरी पुन्हा शेतात रमायला लागला असून पावसाने अशीच साथ दिली तर यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना सुखावून जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये वाढ झाली आहे. शेतजमिनी ओल्या झाल्यामुळे खोळंबलेल्या पेरणीच्या कामांनाही वेग आला आहे. शेतकरी पुन्हा शेतात रमायला लागला असून पावसाने अशीच साथ दिली तर यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना सुखावून जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक कुटुंबांची उपजिविका शेतीवर अवलंबून आहे. आणि बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यानंतर शेतकऱ्यांच्या छातीतील धडधड वाढली होती. साधारणता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पाऊस पडतो. मात्र यावेळी जून महिन्याचा पंधरवाडा लोटला तरी पावसाला सुरुवात झाली नव्हती. मान्सूनपूर्व पाऊसही पडला नाही. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली. दरम्यान, २० जून रोजी एकदा पाऊस पडल्यानंतर काही शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या. काहींनी धूळ पेरणी केली. मात्र ९० टक्के पेरण्या खोळंबल्या होत्या. कृषी विभागाने बºयापैकी पाऊस येईपर्यंत पेरणी करू नये, असा सल्ला दिला होता. त्यामुळे अनेक शेतकºयांनी आपल्या पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या.
प्रारंभी हवामान खात्याने १७ जूनपर्यंत राज्यात मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकरी निश्चिंत होते. मात्र मधल्या काही दिवसात ‘वायू’ नामक चक्रीवादळ आले. त्याने मान्सूनची प्रगती रोखून धरली. त्यामुळे मान्सूनचे आगमन आणखी लांबणीवर गेले. यादरम्यान सूर्यानेही आपली आग ओकणे सुरूच ठेवले. त्यामुळे ग्रामीण भागातील जलस्रोत झपाट्याने आटू लागले. खरीप हंगामाची सुरुवात व्हायची, त्या दिवसात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. ज्यांनी २० जूननंतर पेरण्या केल्या, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले.
अशातच गुरुवार, शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच भागात दमदार पाऊस झाला. या चार दिवसात सूर्याची किरणं फारच कमी वेळासाठी पहायला मिळाली. ढगाळ वातावरण व कधी रिमझिम पाऊस पडत राहिला. यामुळे ग्रामीण भागातील तलाव, बोड्या व इतर जलस्रोत पाणी जमा होऊ लागले. जमिनीतही पाणी मुरुन जमीन ओली झाली. त्यामुळे आतापर्यंत खोळंबून असलेल्या पेरणीच्या कामांना पुन्हा धडाक्यात प्रारंभ झाला आहे. शेतकºयांची धावपळ सुरू झाली असून शेतकरी शेतात रमू लागला आहे.
कोरपना, जिवती, राजुरा या भागात कापसाची पेरणी सुरू झाली आहे. काही ठिकाणी शेतकरी सोयाबीनची पेरणी करीत आहेत. यासोबतच मूल, सिंदेवाही, नागभीड, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी या भागात धानाची पेरणी सुरू झाली आहे. या आठवड्यात ५० ते ६० टक्के पेरण्या आटोपतील असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
साडेचार लाखांवर खरीपाची लागवड
जिल्ह्यात सोयाबीन, कापूस आणि धान हे खरीपातील प्रमुख पीक आहे. मागील वर्षी चार लाख ४७ हजार हेक्टरवर कृषी विभागाने खरीपाचे नियोजन केले होते. मात्र यापैकी कमी हेक्टरवर खरिपाची लागवड झाली. यावर्षी चार लाख ५० हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा पाऊस बºयापैकी पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज असल्यामुळे यावर्षी खरिपातील लागवड क्षेत्र वाढेल, अशी शक्यता आहे.