हवालदिल बेरोजगारांच्या नोकर भरतीकडे नजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:00 AM2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:00:48+5:30
शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून राज्यातील अनेक युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. अनेकांनी तर मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर येथे विशेष शिकवणी वर्ग लावले असून भुक तहान विसरुन दिवसरात्र अभ्यास करीत आहेत. मात्र कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरु करण्यात आले. संपूर्ण उद्योगधंदे, छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले. परिणामी सरकारला मिळणारा महसुल बंद झाला. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी कर्ज घ्यावे लागले.
परिमल डोहणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याची आर्थिक स्थिती सक्षम होईपर्यंत नोकरभरती बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाचा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांकडून कडाळून विरोध होत आहे. मागील अनेक वर्षांपासून भूक-तहान विसरुन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया युवकांमध्ये नैराश्य पसरले आहे. अर्थव्यवस्था सुरळीत होईपर्यंत वेतन कमी द्या, पण नोकरभरती राबवा, अशी आर्त मागणी आता हवालदिल बेरोजगार करताना दिसत आहे.
शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून राज्यातील अनेक युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. अनेकांनी तर मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर येथे विशेष शिकवणी वर्ग लावले असून भुक तहान विसरुन दिवसरात्र अभ्यास करीत आहेत. मात्र कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरु करण्यात आले. संपूर्ण उद्योगधंदे, छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले. परिणामी सरकारला मिळणारा महसुल बंद झाला. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी कर्ज घ्यावे लागले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा असलेल्या विभागाशिवाय इतर सर्व विभागांमधील २०२०-२१ मधील पदभरती राज्यसरकारने रद्द केली. त्यामुळे मोठ्या आशेने राज्य किंवा केंद्रीय सेवेत अधिकारी बनण्याचे स्वप्न भंग झाले. आधीच बेरोजगारीचा डोंगर आहे. त्यातच पुन्हा नोकरभरती बंद केल्याने बेरोजगारांनी करायचे काय, असा प्रश्न उपस्थित होत असून देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होईपर्यंत आम्ही अल्पवेतनात काम करायला तयार आहोत. त्यामुळे सरकारने नोकरभरती घ्यावी, अशी प्रतिक्रीया अनेक बेरोजगार युवकांकडून होत आहे.
वयोमर्यादेचा फटका बसणार
सर्वसाधारण नोकरीसाठी ३३ वर्षापर्यंत अट होती. राखीव जमातीसाठी पाच वर्ष शिथीलता देण्यात आली. मात्र त्यानंतर यामध्ये वाढ करुन ३८ वर्ष करण्यात आले. त्यामुळे अनेकांना संधी चालून आली होती. ज्याची वयोमार्यादा ओलांडण्यासाठी एक ते दोन वर्ष असणारे युवकसुद्धा तयारीला लागले. मात्र आता नोकरभरती बंद करण्यात आल्याने त्यांना फटका बसणार आहे.
व्यवसायासाठी कर्जही मिळेना
देशात बेरोजगारीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातही नोकरभरती बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. व्यवसाय करतो म्हटला, तर शासनाकडून तारण ठेवल्याशिवाय कर्ज मिळत नाही. मात्र करायचे काय, असा प्रश्न बेरोजगारांना पडला आहे.
राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली मात्र अनेक परीक्षेबद्दल संभ्रम
कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्यापूर्वीच राज्यसेवा भरतीची जाहिरात निघाली होती. यामध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले. परीक्षेसंदर्भात वेळापत्रकही तयार झाले होते. मात्र कोरोना संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा, महाअभियात्रिकीसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. मात्र त्याव्यतीरिक्त रेल्वे विभाग, पशुसंवर्धन विभाग आदी विभागाच्या परीक्षासंदर्भात कोणतीही सुचना दिली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सरकारने मोठ्या प्रमाणात नोकरभरती करण्याची घोषणा केली होती. मात्र कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे कारण पुढे करुन नोकरभरती बंद केली. मात्र याही स्थितीत आम्ही सरकारला सहकार्य करण्याच्या अनुषंगाने अर्थव्यवस्था सुरळीत होतपर्यनत मोफत काम करण्यासाठी तयार आहोत. मात्र शासनाने नोकरभरती बंद न करु नये.
-मंगेश सहारे, चंद्रपूर
तत्कालीन सरकारने ७२ हजार पदांची मेगा भरती करू असे सांगितले. मात्र, बेरोजगार युवकांना गाजर दाखविले. महाविकास आघाडी सरकारने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला तेवढ्यात कोरोना महामारीने आगमन झाले. त्यामुळे सरकारने कोणतीही नवीन भरती न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील पाच-सहा वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे नवीन भरती घेण्यात यावी, जोपर्यंत अर्थव्यवस्था रोडवर येत नाही तोपर्यंत कमी पगार दिला तरी चालेल.
-श्रीकांत चोथले, चंद्रपूर
कोरोना संसर्गापूर्वी अनेक विभागात भरती संदर्भात जाहिरात निघाली. त्यामध्ये युवकांनी ५०० ते हजार रुपये चालण भरुन अर्ज भरले. कोरोनाची स्थितीच निवळताच किमान या परीक्षाची पुढील प्रक्रीया सुरु करावी.
-चेतन खोब्रागडे, चंद्रपूर
शासकीय नोकरीच्या आशेने घर सोडून अभ्यासाठी जिल्ह्याचे ठिकाण गाठले. मात्र नोकरभरती बंद करण्याचा निर्णय शासनाने घेऊन सर्व इच्छा-आकांक्षावर पाणी फेरले.
-पुष्पकांत डोंगरे, सावली
अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी बरेच उपाय आहेत. त्याची अमंलबजावणी करावी. आम्ही स्पर्धात्मक परीक्षेला समोर जाण्यास तयार आहोत. नोकरभरती बंद करु नये, ती सुरुच ठेवावी, हक्काचे वेतन द्यावे.
- श्रीकांत साव, चंद्रपूर