सेतू केंद्रात नागरिकांची लूट
By admin | Published: July 14, 2014 11:52 PM2014-07-14T23:52:46+5:302014-07-14T23:52:46+5:30
शासनातर्फे मोठ्या गावात सेतू केंद्र स्थापन करून ग्रामीण नागरिकांना गावातच शासकीय कागदपत्र मिळण्यासाठी सोय केली आहे. मात्र येथे नागरिकांची लुट सुरु असून वाट्टेल तसे दर नागरिकांकडून वसुल केले जात आहे.
तळोधी (बा.) : शासनातर्फे मोठ्या गावात सेतू केंद्र स्थापन करून ग्रामीण नागरिकांना गावातच शासकीय कागदपत्र मिळण्यासाठी सोय केली आहे. मात्र येथे नागरिकांची लुट सुरु असून वाट्टेल तसे दर नागरिकांकडून वसुल केले जात आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.
पूर्वी तहसील कार्यालयातून नागरिकांना प्रमाणपत्र मिळत होते. मात्र यात नागरिकांना आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. त्यातच कागदपत्र वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या होत्या. यापासून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये सेतू केंद्र स्थापन करण्यात आले. मात्र आता काही केंद्रातून नागरिकांची लूट सुरु आहे. त्यामुळे या केंद्राकडे शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
गावातील अनेक सेतू केंद्रामध्ये दरपत्रक नसल्याने नागरिकांकडून वाट्टेल तेवढे दर आकारल्या जात आहे.
या सेतू केंद्रातून उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, वय अधिवास, जात, राष्ट्रीयत्त्व, जन्म, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, महसूल प्रमाणपत्र. आठ (अ), सात-बारा अशा अनेक प्रकारचे प्रमाणपत्र कमी वेळात, मिळून नागरिकांच्या वेळेची व आर्थिक बचत होते. परंतु ग्रामीण भागातील काही सेतू केंद्रात प्रमाणपत्राच्या शासकीय दराचे दर पत्रक न लावता ग्राहकांकडून लुट सुरू आहे. सध्या विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी या केंद्रावर गर्दी करतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून सुद्धा काही केंद्र चालक आर्थिक लुट करीत आहेत. ग्रामीण भागातील मान्यताप्राप्त सेतूकेंद्रात नागरिकांची आर्थिक लूट होवू नये, यासाठी शासकीय दर पत्रकानुसार नागरिकांनी प्रमाणपत्र हस्तगत करावे. यानुसारच नागरिकांनी सेतू केंद्रात पैसे देऊन रितसर पावती घ्यावी. ज्या सेतू केंद्रात पावती दिली जात नाही त्या सेतू केंद्राची जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार करावी, अशी विनंती वामनराव बारसागडे यांनी केली आहे. (वार्ताहर)